पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात जनजागृती:'सिक्युअर होरायझन फॉर यूथ' उपक्रमातून व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन, तरुणाईने घेतली शपथ




पुणे शहर पोलिसांनी ‘सिक्युअर होरायझन फॉर यूथ’ या उपक्रमांतर्गत अमली पदार्थांविरोधात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम गुरुवारी नेहरू स्टेडियम परिसरातील गणेश कला क्रीडा केंद्रात पार पडला. तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवणे, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करणे आणि सुरक्षित समाज घडवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, राजेश बनसोडे, तसेच अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, विविध शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला. सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांनी प्रास्ताविकात युवकांना व्यसनापासून दूर राहून सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी सक्रिय भूमिका बजावून समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे सांगितले. त्यानंतर पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि एएनटीएफचे हिम्मत जाधव यांनी अमली पदार्थांचे वाढते संकट, त्याचे सामाजिक परिणाम, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नागरिकांच्या सहकार्याचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी कोरकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच योग्य मूल्यांची जोपासना करण्याचा संदेश दिला, तर टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय चांदे यांनी करिअर, शिस्त आणि चांगल्या सवयींचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित एका लघुपटाचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत स्वतः व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच इतरांनाही त्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प केला. पुणे शहर पोलिसांनी अशा उपक्रमांद्वारे युवकांमध्ये जनजागृतीची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *