विठ्ठलाला अर्धा किलो सोन्याच्या पादुका:अहिल्यानगरच्या दानशूर भक्ताकडून अर्पण, मात्र नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा




अहिल्यानगरच्या एका दानशूर विठ्ठल भक्ताने श्री विठ्ठल मूर्तीसाठी ४४६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पादुका दान केल्या आहेत. त्याने आपले नाव गोपनीय ठेवावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. या सुवर्ण पादुकांची अंदाजे किंमत रु. ५६ लाख ५९ हजार रुपये इतकी आहे. आषाढी यात्रेचा कालावधी सुरू झाला आहे. मंदिरात सोने, चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था आहे. या कक्षात दानस्वरूपातील मौल्यवान वस्तूंची तपासणी, शुद्धता पडताळणी, वजन, नोंदणी व सुरक्षित स्वीकार करण्यासाठी दोन सराफ, अनुभवी कर्मचारी नियुक्त आहेत. गुरुवारी सकाळी अहिल्यानगर येथील विठ्ठलभक्ताने विठ्ठलाला सुवर्ण पादुका दान केल्या. गेल्या काही वर्षात श्रींच्या पावलांची झीज होत असून ती रोखण्यासाठी लेपन प्रक्रिया केली जाते. या पार्श्वभूमीवर भाविकाने सोन्याच्या पादुका दिल्या. मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्या स्वीकारल्या. आषाढीनिमित्त ३ ऑगस्टपर्यंत २४ तास दर्शन सुरू आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे गुरुवारपासून २४ तास दर्शन सुरू करण्यात आले. गुरुवारी विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला. श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला. गुरुवारपासून २४ तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहणार आहे. राजोपचार बंद करून देवाचे दर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे. आजपासून पहाटेची काकड आरती, पोशाख, धूपारती, शेजारती आदी राजोपचार तात्पुरते बंद राहतील. मात्र नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे नित्योपचार नियमितपणे सुरू राहतील. ३ ऑगस्टपर्यंत (प्रक्षाळपूजा) विठुरायाचे २४ तास दर्शन मिळणार आहे. ‘पुरातत्त्व’ची अभिषेकावेळी पादुका ठेवण्यास परवानगी पुरातत्त्व खात्याने अभिषेकावेळी चांदीच्या पादुका देवाच्या पायावर ठेवण्याची परवानगी दिली आहे. महत्त्वाचे सण, उत्सवानिमित्त देवाला पारंपरिक अलंकार घातले जातात. त्या वेळी या सुवर्ण पादुका देवाच्या चरणावर ठेवल्या जातील. गहिनीनाथ महाराज औसेकर, सह-अध्यक्ष, मंदिर संस्थान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *