नांदेड – जगभरातील लाखो शीख भाविकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या सचखंड श्री हजूर साहिब येथे दररोज हजारो यात्रेकरू दर्शनासाठी येतात. हे भाविक अत्यंत श्रद्धेने सचखंड गुरुद्वारा गेट क्रमांक 5 ते गोबिंद बाग या पवित्र मार्गावर अनेकदा अनवाणी पायी चालत जातात. परंतु अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे या पवित्र मार्गाची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली असून संबंधित प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष गंभीर आणि संतापजनक आहे.
संपूर्ण रस्ता उखडलेला असून गिट्टी, खडी आणि दगड विखुरलेले आहेत. त्यामुळे अनवाणी चालणाऱ्या यात्रेकरूंच्या पायांना रोज दुखापत होत आहे. वृद्ध, महिला, लहान मुले आणि दिव्यांग भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती एका जागतिक धार्मिक स्थळाला अजिबात शोभणारी नाही. याहून गंभीर बाब म्हणजे गोबिंद बाग चौक, भगतसिंग रोड तसेच गेट क्रमांक 5 ते गोबिंद बाग या संपूर्ण मार्गावर रात्री पुरेशा स्ट्रीट लाईटची व्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरते. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघात, चोरी आणि इतर अनुचित घटना घडण्याचा धोका कायम आहे.
भगतसिंग रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. गोबिंद बाग चौक ओलांडताना यात्रेकरूंना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल किंवा ट्रॅफिक पोलिसांची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा ती आधीच टाळणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. प्रश्न असा आहे की, कोट्यवधी रुपयांच्या विकासाच्या घोषणा होतात; मग जगप्रसिद्ध धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गासाठी निधी का मिळत नाही? भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी नाही का?
विशेष म्हणजे हा परिसर वार्ड क्रमांक 17 अंतर्गत येतो. संबंधित लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासन यांना ही परिस्थिती दिसत नाही का? की यात्रेकरूंच्या वेदना आणि नागरिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे? नांदेड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक पर्यटनाचे शहर आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक येथे येतात. अशा परिस्थितीत या मार्गाची झालेली दुरवस्था ही केवळ प्रशासनाची निष्काळजीपणा नसून नांदेडच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी बाब आहे.
महानगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग आणि सर्व संबंधित लोकप्रतिनिधींना आमची ठाम मागणी आहे की
– सचखंड गुरुद्वारा गेट क्रमांक 5 ते गोबिंद बाग रस्त्याची तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करावे.
– संपूर्ण मार्गावर उच्च क्षमतेचे एलईडी स्ट्रीट लाईट बसवावेत.
– रस्त्यावरील गिट्टी, खडी आणि अडथळे तातडीने हटवावेत.
– गोबिंद बाग चौकात स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग व आवश्यक वाहतूक सुरक्षा उपाय त्वरित करावेत.
– यात्रेकरूंना पिण्याचे पाणी, स्वच्छता, पादचारी मार्ग आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
जर या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही, तर भाविक व नागरिकांच्या भावना तीव्र होणे स्वाभाविक आहे. प्रशासनाने वेळेत जागे होऊन आपली जबाबदारी पार पाडावी. यात्रेकरूंची सेवा हीच खरी मानवसेवा आहे. त्यांच्या श्रद्धेचा आणि सुरक्षिततेचा सन्मान राखणे हे प्रत्येक जबाबदार यंत्रणेचे कर्तव्य आहे.
– राजेंद्र सिंघ शाहू
प्रोफेशनल इलेक्ट्रिकल ट्रैनंर, नांदेड
मो. 7700063999
संबंधित व्हिडीओ ….
Post Views: 611
