परभणीच्या हमदापूर येथे मोठा तणाव:छेड काढल्याचा जाब विचारल्याने आरोपीची मुलीसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण; 16 जणांवर अ‍ॅट्रोसिटी




दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या एका आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने मुलीसह तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याची घटना परभणीच्या हमदापूर येथे घडली आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबाने 16 जणांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असून, यामुळे हमदापुरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मानवत तालुक्यातील हमदापूर येथील एक अल्पवयीन तरुणी इयत्ता दहावीत शिकते. गावातीलच सुदर्शन शिंदे नामक तरुणाने या विद्यार्थिनीचा हात धरून माझ्यासोबत चल असे म्हणत तिचा विनयभंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने ही घटना आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर तिच्या वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याचा जाब विचारला. यावेळी त्यांच्या जोरदार बाचाबाची झाली. सुदर्शन शिंदे व गावातील इतर 15 जणांना सोबत घेऊन पीडित मुलीच्या घरी धावून गेला. त्यानंतर घरात शिरून त्याने मुलीसह तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. आरोपीची घरात शिरून पीडितांना मारहाण यावेळी त्याने पीडित कुटुंबीयांना जातिवाचक शिवीगाळ करून काठी, दगड व हाताने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात मुलीसह तिच्या कुटुंबीयांतील 8 जण जबर जखमी झाले. जखमींना तत्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, सुदर्शन शिंदेसह एकूण 16 जणांविरोधात पोक्सो व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (अ‍ॅट्रोसिटी) इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे हमदापूर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी स्वतः या घटनाक्रमावर लक्ष ठेवत आहेत. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी गावात ठाण मांडले आहे. जळगावात 2 गटांमध्ये हाणामारी दुसरीकडे, जळगावच्या नशिराबाद येथे नगरपरिषदेच्या निवडणुकीत काम न करण्याच्या मुद्यावरून 2 गटांत तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेत 16-17 जण जखमी झालेत. या प्रकरणी दोन्ही गटांकडून दगड व विटांचा वापर करण्यात आला. निवडणुकीत आमचे काम न करता दुसऱ्यांचे का केले? या मुद्यावरून या दोन्ही गटांत वाद झाला. त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला. हे ही वाचा… फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने राजकारण सोडले:’आता मला थांबायचंय’ म्हणत संदीप जोशी यांचा तडकाफडकी राजकीय संन्यास भाजप नेते तथा विधानपरिषदेचे सदस्य संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सध्याची राजकीय संस्कृती, पक्षांतर तथा निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणारा कथित अन्याय यावर परखड मत व्यक्त करत 13 मे रोजी आपल्या आमदारकीची मुदत संपल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने राजकारण सोडणे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *