जवळ्यात विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र वाचन करणे अनिवार्य! 


परिपाठातच महत्त्वाच्या बातम्यांचे सामूहिक वाचन; शालेय व्यवस्थापन समितीचा पुढाकार

नांदेड : आजच्या बदलत्या युगात सर्वच वयाची मुले आपला जास्तीत जास्त वेळ टीव्ही, मोबाइल आणि सोशल मीडियावर घालवत असतात. परिणामी त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असते. अशा परिस्थितीत वाचनाची सवय लागण्याच्या हेतूने वर्तमानपत्र वाचण्याचा हा उपक्रम जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीने सुरू केला आहे. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले आणि पदाधिकारी यांनी पुढाकार घेत शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दररोज वर्तमानपत्र वाचन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

      शालेय व्यवस्थापन समितीने घेतलेल्या एका निर्णयानुसार शाळांच्या प्रार्थनेच्या आधी दररोज १० मिनिटे महत्त्वाच्या सुसंस्कारक्षम, स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि क्रीडाविषयक बातम्यांचे सामूहिक वाचन केले जात आहे. परिपाठात निवडक बातम्यांचे वाचन केले जाते. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी दररोज पाच नव्या शब्दांची माहिती मुला-मुलींना देण्यात येत आहे. त्याची जबाबदारी इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रांचे वाचन करण्यास लावण्याबरोबरच त्यांच्या भाषा सुधारणेवरही भर देण्यात येत आहे. त्यासाठी शिक्षकही विद्यार्थ्यांना वाचनाच्या पद्धती शिकवत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना टिव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर ठेवून ज्ञानाकडे नेण्याचा चांगला प्रयत्न केला जात असल्याबाबत पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारने त्यांच्या राज्यातील शाळकरी मुलांसाठी वर्तमानपत्रांचे वाचन अनिवार्य केले आहे. याच धर्तीवर लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील शालेय व्यवस्थापन समितीने  त्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वर्तमानपत्र वाचनामुळे केवळ मुलांच्या माहितीतच भर पडत नाही, तर त्यांची वाचनाची गती, समज आणि भाषा याबाबतीतही सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास आम्हाला वाटतो. 

          – सुरेश गोडबोले, शालेय व्यवस्थापन समिती, जवळा देशमुख. 

शाळेत दररोज दोन तीन वेगवेगळी वृत्तपत्रे मागविण्यात येतात. या उपक्रमामुळे वर्तमानपत्रे वाचनाची आवड निर्माण हाेऊन त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. भाषेबरोबरच विचार करण्याच्या क्षमतेत सुधारणा होईल. वर्तमानपत्र वाचनादरम्यान विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढवण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. रोज पाच नवे शब्द निवडावेत. त्यांचे अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगावेत आणि त्यांचा वाक्यात उपयोगही शिकवावा, अशी सूचना शिक्षकांना दिली आहे.

           – गंगाधर ढवळे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळा देशमुख. 

Post Views: 6






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *