![]()
कोरेगाव भीमा 2018 चौकशी आयोगासमोर प्रसिद्ध साहित्यिक व निवृत्त सनदी अधिकारी विश्वास पाटील यांची शुक्रवारी पुणे येथे उलट तपासणी झाली. महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी ही तपासणी दिवसभर घेतली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘संभाजी’ या कादंबरीतील महाराजांच्या अंत्यविधीवरील कथनावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाले होते. काही गटांनी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीने केला अशी भूमिका घेऊन दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यात कोरेगाव येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ज्याची चौकशी सध्या सुरू आहे. या उलट तपासणीदरम्यान विश्वास पाटील यांनी मान्य केले की, संभाजी महाराजांच्या अंत्यविधीबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तात उल्लेख नाही. त्यांनी स्पष्ट केले की, ‘संभाजी’ या कादंबरीतील अंत्यविधीचा उल्लेख पूर्णतः काल्पनिक आहे. जना परिटीन, गोविंद नाक, दामाजी पाटील आणि पाटलीन हे उल्लेखही पूर्णतः काल्पनिक असल्याचे त्यांनी ॲड. हिरे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. ॲड. हिरे यांनी विविध ऐतिहासिक ग्रंथ व संदर्भांचा पुरावा देत विश्वास पाटील यांना हे मान्य करण्यास भाग पाडले की, ‘संभाजी’ ही कादंबरी भूभाग व काही तथ्यांवर आधारित कल्पना विलास आहे. ॲड. हिरे यांनी जेधे शकवली, मासीरे आलमगिर, ईश्वरदास नागर, भीमसेन सेक्ससेना, खाफी खान या तत्कालीन इतिहासकारांचा उल्लेख करत कादंबरीतील कल्पनाविलासाचा फोलपणा आयोगासमोर आणला. पाटील यांनी उलट तपासणीत हे देखील सांगितले की, त्यांच्या लेखनाचा गैरवापर करून कोणी दोन समाजात तेढ निर्माण करत असेल, तर ते निषेधार्थ आहे.
विश्वास पाटील यांची कोरेगाव भीमा आयोगासमोर उलट तपासणी:'संभाजी' कादंबरीतील अंत्यविधीचा उल्लेख काल्पनिक असल्याचे मान्य
