स्वदेशी तंत्रज्ञानाने तांत्रिक सार्वभौमत्व बळकट करा- डॉ. सारस्वत:'रेझोनन्स 2026' मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल ट्विनवर चर्चा




डिजिटल ट्विन, एज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आयओटी तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शहरांच्या व्यवस्थापनाचा खर्च २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. यामुळे पायाभूत सुविधांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, एआयच्या वाढत्या वापरामुळे सायबर सुरक्षेची नवी आव्हानेही निर्माण होत आहेत. त्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून देशाचे तांत्रिक सार्वभौमत्व अधिक मजबूत करणे आवश्यक आहे, असे मत डीआरडीओचे माजी महासंचालक आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी व्यक्त केले. डीईएस पुणे विद्यापीठ, डीआरडीओ आणि आयईईई पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रेझोनन्स २०२६ – डेटा एआय हार्मनीज फॉर सोसायटी ईटीएफआय-२०२६’ या विशेष सत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयातील अँम्फीथिएटर येथे पार पडला. या वेळी वेस्टर्न नॉर्वे रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. राजेंद्र आकेरकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ. मनीष जोशी, एलियट सिस्टिम्सचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज धुमे, डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश इंगळे आणि डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य उपस्थित होते. डॉ. सारस्वत यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता देशाच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देत विद्यार्थिनी, संशोधक आणि प्राध्यापकांनी एआय क्षेत्रात सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. संरक्षण क्षेत्रातील अनुभव सांगताना त्यांनी नमूद केले की, १९६० च्या दशकात भारतात ऑटोमेशन आणि सिग्नल प्रोसेसिंगवर काम सुरू झाले होते. परंतु, त्या काळात संगणकीय क्षमता मर्यादित असल्याने एआय केवळ संकल्पनेपुरतेच मर्यादित राहिले. बिग डेटा, विश्लेषण आणि मशीन लर्निंगच्या प्रगतीमुळे आज एआयचा झपाट्याने विस्तार होत आहे. भविष्यात शहरांच्या विकासात एआय महत्त्वाची भूमिका बजावणार असून ‘एआय-चालित स्मार्ट सिटी’ ही संकल्पना शहरांना अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत बनवेल. एआयच्या मदतीने ऊर्जा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, गुन्हेगारी विश्लेषण आणि हवामान जोखीम यांसारख्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा साधता येतील, असेही डॉ. सारस्वत यांनी स्पष्ट केले. डॉ. मनीष जोशी यांनी सांगितले की, एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्या सोडवण्यासाठी एआयच्या विविध कल्पना मांडल्या असून त्यापैकी ५० हून अधिक संघांमधून निवडलेल्या १४ कल्पना तज्ज्ञांसमोर सादर केल्या जाणार आहेत. देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये एआयविषयी जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले जात असून स्वयंम या ऑनलाइन व्यासपीठावर एआयशी संबंधित अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *