![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात राज्यातील बळीराजासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेची घोषणा केली आहे. या निर्णयाचे प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्वागत केले असले, तरी योजनेतील काही अ
.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने मध्यस्थी करत शेतकरी कर्जमाफीसाठी जून २०२६ ची मुदत दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनुसार, सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत कर्ज न फेडू शकलेल्या शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेले हे आश्वासन अर्थसंकल्पात पूर्ण केल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, बच्चू यांनी या योजनेत काही त्रुटी दाखवत प्रश्न उपस्थित केले आहेत.
नेमके काय म्हणाले बच्चू कडू?
सरकारच्या या निर्णयावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफी जाहीर केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र, यामध्ये काही त्रुटी आहेत. दुष्काळामुळे होरपळलेल्या चालू कर्जदारांनाही यातून दिलासा मिळायला हवा होता. तसेच, जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज भरतात, त्यांना केवळ ५० हजार रुपये देणे अन्यायकारक आहे. त्यांना किमान दीड लाख रुपये दिले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने समतोल राखला जाईल.”
आंदोलनावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर
काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू यांनी मुंबईत केलेल्या कर्जमाफी आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. “आम्ही जेव्हा कर्जमाफीसाठी मुंबईत आंदोलन केले, तेव्हा आमच्यावर खूप टीका झाली होती. आज त्या टीकाकारांना उत्तर मिळाले आहे. कर्जमाफी देण्यापासून दूर पळणाऱ्या सरकारला आम्ही ही घोषणा करायला भाग पाडले आहे,” असा दावा त्यांनी यावेळी केला.
शेतकरी नेत्यांची बोलावली बैठक
कर्जमाफीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी बच्चू कडू आता आक्रमक झाले आहेत. येत्या १४ किंवा १५ तारखेला ते राजू शेट्टी, अजित नवले, महादेव जानकर आणि रविकांत तुपकर यांच्यासह सर्व प्रमुख शेतकरी नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सरकारसमोर पुढील मागण्या कशा मांडायच्या आणि आंदोलनाची दिशा काय असेल, यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
हे ही वाचा…
फडणवीस सरकारची कर्जमाफी तकलादू:राजू शेट्टींसह अजित नवलेंची सरकारवर जोरदार टीका; म्हणाले- शेतकऱ्यांचा विश्वासघात
सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफी घोषणेवर प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या कर्जमाफीला तकलादू, असे संबोधत राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. ऑक्टोबर महिन्यात शेतकरी आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन दिले होते, असा दावा त्यांनी केला. मात्र आता केवळ दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील, असे त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा…
