Medha Manjrekars Emotional Cancer Fight Post; Mahesh Manjrekars Wife Thanks Him


मुंबई33 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांच्या कुटुंबातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच भावनिक बातमी समोर आली आहे. महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. याबाबतची अधिकृत माहिती खुद्द मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एक अतिशय हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करत त्यांनी कर्करोगावरील उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडल्याचे सांगितले असून, या कठीण काळात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या कुटुंबाचे आणि मित्रपरिवाराचे आभार मानले आहेत.

कॅन्सरशी यशस्वी झुंज; उपचारांचा एक टप्पा पूर्ण

मेधा मांजरेकर यांनी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून त्या पडद्यामागे एका मोठ्या आजाराशी झुंज देत होत्या. वाढदिवस जवळ आला असताना, त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या कॅन्सरच्या उपचारांचा, सर्जरीचा आणि केमोथेरपी-रेडिएशनचा अनुभव शब्दबद्ध केला आहे.

काय म्हणाल्या मेधा मांजरेकर आपल्या पोस्टमध्ये?

आपल्या आजारपणातील भावना व्यक्त करताना त्या म्हणतात, “आयुष्यात काही प्रवास असे असतात जे तुम्हाला कायमचे बदलून टाकतात. माझा हा प्रवास त्यापैकीच एक होता. माझ्या उपचारांचा एक टप्पा संपत आहे आणि माझा वाढदिवस जवळ येत आहे, तेव्हा मी मागे वळून पाहते… मी माझ्या आजाराकडे, सर्जरीकडे किंवा केमोथेरपी आणि रेडिएशनकडे पाहत नाही. मी पाहते ते देवाने माझ्या पाठीशी उभे केलेले अदृश्य हात, ज्यांनी मला रोज सावरले.”

“हा प्रवास मी एकटीने नाही पार पाडला…”

“लोक मला अनेकदा विचारतात की, तुम्ही यातून कसे बाहेर पडलात? त्याचे उत्तर खूप सोपे आहे, मी या प्रवासात कधीच एकटी नव्हते. जेव्हा जेव्हा मला वाटले की मी आता पुढचे पाऊल टाकू शकत नाही, तेव्हा तेव्हा कोणीतरी माझ्यासोबत चालण्यासाठी आले. परमेश्वर नेहमीच देवाच्या रूपात येत नाही; तो गुरु, डॉक्टर, नर्सेस, कुटुंब आणि मित्रांच्या रूपात माझ्या आयुष्यात आला,” अशी अत्यंत कृतज्ञतापूर्वक भावना त्यांनी व्यक्त केली.

लेकींना आणि पती महेश मांजरेकरांना दिला खास संदेश

  • या कठीण काळात कुटुंबाने दिलेल्या आधाराबाबत बोलताना त्यांनी आपल्या मुली आणि पती महेश मांजरेकर यांच्यासाठी खास संदेश लिहिला आहे.
  • मुलींसाठी: “एका आईला नेहमी वाटते की ती आयुष्यभर आपल्या मुलांचा हात धरून चालेल. पण या प्रवासाने मला शिकवले की मुले नकळतपणे आईचा हात घट्ट धरतात. माझा हात धरल्याबद्दल थँक्यू मुलींनो.”
  • महेश मांजरेकरांसाठी: “थँक्यू महेश… फक्त माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल. काही प्रवास असे असतात जे तुम्ही एकटे पूर्ण करू शकत नाही.”

मित्रांचे मानले आभार; सांगितली पाणीपुरीची आठवण

या आजारपणात भूक उडालेली असताना मित्रांनी आणि जवळच्या लोकांनी कशी काळजी घेतली हे सांगताना मेधा मांजरेकर म्हणतात, “जेव्हा उपचारांमुळे माझी भूक कमी झाली होती, तेव्हा कुणाला तरी नेहमी माहीत असायचे की मी काय खाऊ शकेन. कधी ढोकळा, कधी इडली, तर कधी अचानक खावीशी वाटलेली पाणीपुरी. एका मित्राने तर मला क्रॅनबेरी ज्यूस चक्क शॅम्पेनच्या ग्लासमधून पिण्याचा सल्ला दिला. साधे पदार्थ पण ते खूप प्रेमाने दिले गेले.”

मेधा मांजरेकर यांच्या या पोस्टनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला असून, त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मेधा मांजरेकर यांनी केलेली पोस्ट

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा:छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 5 दिवस पावसाची शक्यता, कसे राहील हवामान?

जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्याला चांगलेच झोडपून काढले आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने राज्यात उकाडा कमालीचा वाढला आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असतानाच, भारतीय हवामान विभागाने एक मोठा आणि दिलासादायक इशारा दिला आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचे पुनरागमन होणार आहे. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *