![]()
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले अन्न व औषध प्रशासन विभाग निद्रावस्थेत असल्याचा संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील एका स्वीट मार्टमधून खरेदी केलेल्या चकलीमध्ये चक्क नायलॉनचा धागा आढळल्याने खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, संबंधित ग्राहकाने ही चकली भेट म्हणून बाहेर राज्यात राहणाऱ्या नातेवाईकांना देण्यासाठी तब्बल पाच दिवसांपूर्वी खरेदी केली होती. मात्र, भेटवस्तू घरीच राहिल्याने आज ती उघडून पाहताना ग्राहकाला धक्काच बसला. चकली खाताना त्यामध्ये नायलॉनचा धागा आढळून आला. सुदैवाने हा धागा वेळीच लक्षात आला; अन्यथा तो पोटात गेल्यास आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. शहरातील स्वीट मार्टमध्ये विविध खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यासाठी बेसनासह विविध कच्चा माल विकत घेतला जातो. मात्र, हा कच्चा माल नेमका कोणत्या दर्जाचा आहे, त्याची गुणवत्ता काय आहे, त्यामध्ये कोणती भेसळ किंवा बाह्य वस्तू मिसळलेली नाही ना, याची पुरेशी शहानिशा केली जाते का, हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये निष्काळजीपणा खपवून घेता येणार नाही. एखाद्या पदार्थात धागा, प्लास्टिक अथवा अन्य परकीय वस्तू आढळल्यानंतरच प्रशासनाने कारवाई करायची का? असा सवाल उपस्थित होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने केवळ कागदोपत्री तपासणी न करता शहरातील स्वीट मार्ट, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची अचानक तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत तपासावेत. दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे भेसळखोरांचेच चांगभलं सुरू राहणार आहे. याप्रकरणी स्वीट मार्ट व्यावसायिका सोबत संपर्क साधला असता,नंतर बोलतो असे सांगण्यात आले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
