गाडीपुरा घरफोडीचा गुन्हा काही तासांत उघडकीस – VastavNEWSLive.com

[ads1]

रोख रक्कम व सोन्याचे मणी असा १ लाख ३८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)-  शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश गल्ली, गाडीपुरा परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा इतवारा गुन्हेशोध पथकाने अवघ्या काही तासांत उघडकीस आणला. या प्रकरणात एका  आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रक्कम आणि पिवळ्या रंगाचे धातूचे ४० मणी असा एकूण १ लाख ३८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रमसिंह नारायणसिंह ठाकूर (वय ४२, व्यवसाय मजुरी, रा. गणेश गल्ली, गाडीपुरा, इतवारा, नांदेड) हे १३ सप्टेंबर रोजी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. रात्री त्यांच्या पत्नी घरी परतल्यानंतर घराचा कडी-कोयंडा उघडा असल्याचे तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. कपाट उचकटून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे समोर आले. चोरी गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३ लाख १२ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासादरम्यान परिसरातील किराणा दुकानदार दिपकसिंग उर्फ पियुष जीवनसिंग ठाकूर (वय २२) याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.  त्यानंतर दोन पंचांसमक्ष त्याच्या राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील स्टोअर रूममध्ये पलंगाखाली लपवून ठेवलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ३६ हजार ७०० रुपये रोख आणि पिवळ्या रंगाचे धातूचे ४० मणी, असा एकूण १ लाख ३८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


दरम्यान, या गुन्ह्यातील उर्वरित सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, आरोपीने अशाच प्रकारचे इतर घरफोडीचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड  मिळवण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारा पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हेशोध पथकाने केली.


Post Views: 441










[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *