![]()
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार हादरा बसला आहे. आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास हिंगोली शहरासह वसमत आणि औंढा नागनाथ परिसरातील जमीन अचानक हादरली. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरच्या (भूमापक केंद्र) माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. अचानक घरांचे पत्रे आणि घरातील भांडी वाजू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि अनेकांनी सुरक्षेसाठी थेट रस्त्यावर धाव घेतली. सुदैवाने यात अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. सकाळी ११.२६ ला बसला जोरदार धक्का मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास नागरिक आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना, ११ वाजून २६ मिनिटांनी जमिनीतून गूढ आवाज आला आणि जोरदार हादरा बसला. हिंगोली शहरासह शेजारील वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी असल्याने हा धक्का बऱ्याच स्पष्टपणे जाणवला. प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन या भूकंपामुळे सुदैवाने अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवितहानी किंवा मोठ्या वित्तहानीची नोंद झालेली नाही. मात्र, भूकंपाचे धक्के वारंवार जाणवत असल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला असून, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी हिंगोलीसह परभणी-नांदेडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. हिंगोली, परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांमधील अनेक भागांत मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीतील शिरळी परिसरात 4.6 रिश्टर स्केलची नोंद झाली. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर, निळा रोड या भागातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून भूकंपाची मालिकाच सुरु आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे नागरीक भयभित झाले आहेत. गुरुवारी ता. 9 पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून शिरली (ता. वसमत) हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून खोली 10 किलोमिटर आहे. त्यानंतर दुसरा धक्का 2.15 मिनिटांनी 3.6 रिश्टर स्केल, 2 वाजून 17 मिनिटांनी 3.9 रिश्टर स्केल, तर 3 वाजून 23 मिनिटांनी 4.1 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली असूनत त्याचे केंद्रबिंदू काकडदाभा (औंढा नागनाथ) असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भूकंपाचे धक्के वसमत, हिंगोली, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात अधिक तिव्रतेने जाणवले आहे. ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. आमदरी येथे एका घराची भिंत कोसळली असून 10 ते 12 घरांना तडे गेले आहेत. तसेच पांगरा शिंदे गावात 50 ते 60 घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये- गुप्ता हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सज्ज असून स्थानिक यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊन नये आपत्कालीन परिस्थिती किंवा नुकसान आढळल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनीही समाजात भितीचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमातून पोस्ट करू नये. हेही वाचा.. हिंगोलीतील भूकंपाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करा:आमदार प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेत मागणी हिंगोली जिल्ह्यात विशेषतः वसमत तालुक्यांमध्ये वारंवार घडणाऱ्या भूकंपाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी तारीख 9 विधान परिषदेत केली आहे. वसमत तालुक्यामध्ये पांगरा शिंदे व परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे परिसरातील गावकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने या भागात पाहणी करावी अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा
मराठवाडा पुन्हा हादरला:दोन दिवसांपूर्वी 3 जिल्ह्यांत धक्के बसल्यानंतर आज हिंगोलीत 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप
