![]()
मोर्शी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ठाणेदार राहुल आठवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास कायम ठेवल्यास यशाचे शिखर सहज गाठता येते, असे प्रतिपादन त्यांनी केले. नवनीत डायनामिक आणि आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बारावी आणि एमएच-सीईटी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. साबू मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रजनीश बांबोळे होते. ठाणेदार राहुल आठवले यांच्यासह आकाश इन्स्टिट्यूटचे डेप्युटी रिजनल डायरेक्टर राहुल त्यागी, निशिंत तिवारी, विकास रंजन, बालरोगतज्ञ डॉ. विवेक साबळे, हृदयरोगतज्ञ डॉ. सागर श्रीराव, अमित पांडे आणि पत्रकार अजय पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आठवले यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, आजचा विद्यार्थी हा उद्याचा देश घडवणारा महत्त्वाचा घटक आणि आदर्श नागरिक आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून एमपीएससी, यूपीएससीसारख्या परीक्षा उत्तीर्ण कराव्यात आणि भविष्यात मोठे अधिकारी बनून मोर्शी शहराचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित अतिथींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावर्षी संस्थेतील ३३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून मोर्शी शहराचे नाव उज्वल केले. या सर्व विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी डॉ. सागर श्रीराव, डॉ. विवेक साबळे आणि प्रा. रजनीश बांबोळे यांनीही आपले विचार मांडले. नवनीत डायनामिक इन्स्टिट्यूटचे संचालक विनोद गेडाम यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. मोहन मळसने यांनी प्रास्ताविक, जीवन देशमुख यांनी पीपीटी प्रेझेंटेशन तर अनंत नवघरे यांनी आभार प्रदर्शन केले. अमर गेडाम, पंकज रोडे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न:जिद्द, चिकाटीने यश मिळते – ठाणेदार आठवले
