![]()
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच भाजप नेते के. अण्णामलाई यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अमराठी मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने भाजपकडून उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील विविध राज
.
प्रचारावेळी अण्णामलाई यांनी ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी’ असे वादग्रस्त विधान केले. मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करत त्यांनी हे शहर महाराष्ट्राचे नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे मत मांडले. त्यांच्या या विधानामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. मुंबई ही केवळ एक महानगर नसून ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा, इतिहासाचा आणि संघर्षाचा अविभाज्य भाग असल्याची भावना पुन्हा एकदा तीव्र झाली आहे.
एका मुलाखतीत बोलताना अण्णामलाई यांनी मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणत आपली भूमिका अधिक ठळकपणे मांडली. ते म्हणाले की, बॉम्बे हे महाराष्ट्रातले शहर नाही, तर ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे शहर आहे. यासोबतच त्यांनी ‘ट्रिपल इंजिन सरकार’ची संकल्पना मांडली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल, तरच शहराचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. देशातील इतर मोठ्या शहरांचे उदाहरण देत त्यांनी चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमधील सत्तासंरचना सांगितली आणि मुंबई हे असे एकमेव शहर असल्याचे सांगितले, जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य असल्याचा दावा केला.
शेवटी पोटातले ओठांवर आलेच – अखिल चित्रे
अण्णामलाईंच्या या वक्तव्यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे यांनी भाजपवर थेट हल्लाबोल करत जोरदार शब्दांत निषेध व्यक्त केला. शेवटी पोटातले ओठांवर आलेच, असे म्हणत त्यांनी भाजपवर मराठी माणसाला चिथावण्याचा आरोप केला. निवडणुकांसाठी बाहेरच्या नेत्यांना मुद्दाम आणून मुंबईबाबत अशी विधाने करून मराठी अस्मितेला डिवचू नये, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणणे आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवणे हे सहन केले जाणार नाही. पुन्हा तुमचा कुणी भाजपवाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला, तर तुमची मराठी माणसाशी थेट गाठ आहे, असा इशाराही त्यांनी दिला. शहरांची नावे ही केवळ शब्द नसतात, तर ती भाषा, इतिहास, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमानाचे प्रतीक असतात. मुंबई म्हणजे केवळ एक आर्थिक राजधानी नाही, तर ती महाराष्ट्राच्या ओळखीचा कणा आहे, असे सांगत चित्रे यांनी मुंबई म्हणजे मुंबईच, बॉम्बे नाही आणि मुंबई महाराष्ट्राचीच आहे, असे ठासून सांगितले.
वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले
भाजपकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केले जात असलेले हे वक्तव्य म्हणजे मुंबईच्या आणि मराठी अस्मितेच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या विधानामुळे निवडणुकीच्या प्रचारात भावनिक मुद्दे अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, अण्णामलाईंच्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. अमराठी मतदारांवर लक्ष केंद्रित करताना मुंबई आणि महाराष्ट्राच्या ओळखीबाबत केलेल्या विधानांचा भाजपला किती राजकीय फायदा किंवा तोटा होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, मुंबईच्या नावावरून आणि अस्मितेवरून सुरू झालेला हा वाद निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
