.

जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बाळांच्या अपघाती मृत्यूस जबाबदार कोण, हे शोधण्यासाठी येथे आ लेल्या सत्यशोधन समितीने दिवसभर काथ्याकूट करीत चौकशी पूर्ण केली. शिवसैनिकांचा दबाव असल्यामुळे ऐनवेळी या समितीला स्थळ बदलवावे लागले. त्यामुळे डफरीन हॉस्पीटलमधील नियोजित बैठक सुरक्षा रक्षकांच्या निगराणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घेतली. दरम्यान या समितीला निष्कर्षाप्रत येण्यासाठी आठवडा लागेल, असे अध्यक्षांच्यावतीने सचिव जयंत मुळे यांनी सांगितले.
व्हॅन्टिलेटरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत डफरीन हॉस्पीटलच्या एआयसीयूमधील तीन नवजात बालकांचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची सर्वंकष चौकशी करुन निष्कर्षाप्रत येण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त डॉ. संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती गठित केली. त्यात २० सदस्य आहेत. या समितीने बुधवारी घटनास्थळाची पाहणी केली. अध्यक्ष व सदस्यांनी वेगवेगळ्या हॉस्पीटलमधील बालकांच्या प्रकृतीची माहिती घेतली.या समितीची बैठक डफरीनच्या कान्फरन्स हॉलमध्ये होणार होती. परंतु तिथे लोकप्रतिनिधींच्या भेटी, शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे त्यांना तेथे बैठक घेणे शक्य नव्हते. त्यामुळे बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घेतली. शिवसैनिकांनी तिथेही लक्ष्य करण्याचे ठरवले होते. त्यामुळे संभाव्यधोका लक्षात घेता राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात होत्या. बैठकीत सर्वांची मते नोंदवली. चर्चेत जिल्हाधिकारी येरेकर यांनीही माहिती दिली. अहवालापूर्वी समिती बैठक घेणार असून, आठवडाभरात निष्कर्ष सरकारला कळवणार आहे.
स्त्री रुग्णालयात अपघातस्थळाची पाहणी करताना सत्य शोधन समितीचे अधिकारी. काटकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत, संभाजीनगर येथील विद्युत विभागाचे एसई दयानंद बहात्रे व वैद्यकीय अभियंता मनीष मगरे, नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन कॉलेजचे संचालक सुधीर इंगळे व एम्सचे डॉ. निशांत बानाईत, पुणे येथील डीएमइआरचे संचालक डॉ. सुशांत माने, विद्युत निरीक्षक गणेश कंदीकुरवार, मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश हंबर्डे, अग्नीशमन सेवा अधीक्षक अजय पंधरे, महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, अकोला येथील जीव वैद्यकीय अभियंता नितीन सावळे, पुणे येथील पीएचआयचे संचालक डॉ. योगेंद्र सवई, आरोग्य उपसंचालक डॉ. वाकचौरे, पत्रकार गजानन मोहोड, मनपा उपायुक्त शिल्पा नाईक यांचा समावेश आहे. पुणे येथील आरोग्य उपसंचालक (परिवहन) जयंत मुळे हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
अंधारे यांचा तीनवेळा फोन काटकर रुग्णालयांत जाऊन बाळांची पाहणी करीत असताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तीनवेळ त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यावेळी त्या डफरीन हॉस्पीटलमध्ये शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पाठलाग करत जिल्हा कचेरी गाठली. त्यामुळे समितीने त्यांनाही बैठकीत सामावून घेत त्यांच्याकडूनही बरीच माहिती घेतली. त्यांनी काही कागदपत्रे पुरवली, अशी माहिती आहे.
