नवीन नांदेड(प्रतिनिधी) – १० जुलै २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस पथकाने अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ढवळे कॉनर ते उडाणनगर मार्गावर अवैध देशी व विदेशी दारूची विक्री आणि वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस पथकाने सापळा रचून एका संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव साईनाथ बालाजी कदम (रा. चिखली, ता. कंधार, जि. नांदेड) असे सांगितले.
आरोपीच्या ताब्यातून एमएच २६ सीयू ६७०७ (MH 26 CU 6707) क्रमांकाची मोटारसायकल, जिची किंमत अंदाजे ९०,००० रुपये आहे, ती जप्त करण्यात आली. तसेच, त्याच्याकडे देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या (१८० मि.ली.) सापडल्या, ज्यांची किंमत ४१,४२० रुपये इतकी आहे. अशाप्रकारे एकूण १,३१,४२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८५२/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या कामगिरीबद्दल त्यांनी पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल कारमुंगे, जकुट, पोलीस कॉन्स्टेबल कदम, जाधव आणि सिरमलवार या सर्व टीमचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 2
