भाऊसाहेब रंगारी गणपतीचे सकाळी 8 वाजता सुवर्णगणेश धामातून प्रस्थान:सायंकाळी 6 वाजता मंडईतून विसर्जन मिरवणूक सुरू होईल, मानाच्या गणपतींना पुष्पहार

[ads1]


गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीची रूपरेषा जाहीर केली आहे. सकाळी सुवर्णगणेश धाम येथे पूजाविधी होईल, त्यानंतर रथातून मंडईतील टिळक पुतळ्याकडे प्रस्थान होईल आणि सायंकाळी ६ वाजता मंडईतून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता श्री सुवर्णगणेश धाम येथे श्रींची अनंत चतुर्दशी पूजा होईल. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि झोन १ पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले हे सपत्नीक या पूजाविधीला उपस्थित राहतील. पूजेनंतर सकाळी ८ वाजता श्रींची मूर्ती विघ्नहर्ता रथातून सुवर्णगणेश धाम येथून मंडईतील टिळक पुतळ्याकडे विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होईल. पुण्याच्या गणेशोत्सवातील प्रथा आणि परंपरेनुसार, टिळक पुतळा येथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण केले जातील. मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यावर, पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता मंडई येथून भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले, “पुण्याच्या गणेशोत्सवाला लाभलेली समृद्ध परंपरा आणि संस्कृती जपून यंदाचा विसर्जन सोहळा भक्तिभावाने व उत्साहात पार पडावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होताना मिरवणुकीत शिस्त व शांतता राखावी.” ते पुढे म्हणाले, “पर्यावरणाचे भान ठेवून पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सर्व गणेशभक्तांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाची सांगता करावी.”

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *