मराठी भाषा दिन : अभिव्यक्तीचा उत्सव – VastavNEWSLive.com

0
मराठी-भाषा-दिन.jpg


      आपली भाषा ही अभिजात मराठी म्हणून मान्य झाली आहे.  अमृतातेही पैजा जिंकणारी आपली ही मातृभाषा आणि ही भाषा बोलण्याचा सार्थ अभिमान आपण बाळगत आहोत कोणत्याही भाषेत असणारे शब्द स्वीकारण्याची आणि त्यानुरूप उत्क्रांत होण्याची क्षमता असल्यामुळे आपली मराठी समृद्ध आणि संपन्न होत आहे, याचाही सार्थ अभिमान आपणास हवा.

            दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात “मराठी भाषा दिन” म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ कवी वसंत बापट यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची वाहक असते. २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांचा जन्मदिन. त्यांच्या साहित्यिक कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषेचा समृद्ध वारसा

         मराठी ही इंडो-आर्यन भाषासमूहातील एक प्रमुख भाषा असून तिचा इतिहास सुमारे एक हजार वर्षांहून अधिक जुना आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या अभंग-ओव्यांनी मराठीला अध्यात्मिक उंची दिली. पुढे शाहिरी परंपरा, पोवाडे, भारुडे, कीर्तन या माध्यमांतून मराठी जनमानसात रुजली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी प्रशासनाची भाषा बनली. राजकारभारात, किल्ल्यांवरील पत्रव्यवहारात आणि शासननिर्णयांत मराठीचा प्रभावी वापर होत असे. त्यामुळे मराठीला स्वाभिमानाचे आणि स्वराज्याचे प्रतीक मानले जाते.

साहित्य, पत्रकारिता आणि आधुनिक मराठी

लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’सारख्या वृत्तपत्रातून मराठी पत्रकारितेला बळ दिले. पुढे प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज अशा अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले. कादंबरी, कथा, कविता, नाटक, चित्रपट, दूरदर्शन, रेडिओ आणि आता डिजिटल माध्यमांमुळे मराठीची अभिव्यक्ती अधिक व्यापक झाली आहे.

         आज मराठी भाषा विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासन, शिक्षण आणि सामाजिक माध्यमांमध्येही प्रभावीपणे वापरली जात आहे. मराठी विकिपीडिया, ब्लॉग्स, यूट्यूब, पॉडकास्ट या माध्यमांतून नव्या पिढीला मराठीची ओढ निर्माण होत आहे.

भाषा जपणे – काळाची गरज

जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी आणि इतर भाषांचा प्रभाव वाढत असला तरी मातृभाषेचे महत्त्व कमी होत नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विचारांची मांडणी स्पष्ट होते, सर्जनशीलता वाढते आणि संस्कार दृढ होतात.

मराठी भाषा दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, दैनंदिन जीवनात मराठीचा जाणीवपूर्वक वापर करण्याची शपथ घेण्याचा दिवस असावा. घरात, कार्यालयात, शाळेत आणि सार्वजनिक व्यवहारात मराठीचा सन्मानपूर्वक वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपली ओळख आहे, संस्कृती आहे, आत्म्याचा आवाज आहे. “जय जय महाराष्ट्र माझा” म्हणताना ज्या अभिमानाची भावना जागते, तीच भावना मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अधिक दृढ व्हावी.चला, मराठी भाषा दिनी आपण सर्वांनी मराठीचा गौरव करूया, तिचे संवर्धन करूया आणि पुढील पिढ्यांसाठी हा अमूल्य ठेवा जपूया.

मराठी माझी मायबोली

मराठी माझा बाणा

मराठी माझा अभिमान!

(प्रशांत दैठणकर)

प्रभारी उपसंचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय

छत्रपती संभाजीनगर


Post Views: 8






वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks