दलित पँथरचा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा:'समर्थ कॉप केअर' विरोधात कारवाईची मागणी, विधानभवनावर मोर्चाचा इशारा




‘समर्थ कॉप केअर’ या संस्थेने शेतकरी, कष्टकरी आणि हजारो सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या संस्थेविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दलित पँथरच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. फसवणूकग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चाची सुरुवात पुणे कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. घोषणाबाजी करत हा मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर पोहोचला. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष यशवंत नडगम यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी फसवणूक प्रकरणातील मुख्य आणि सहआरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच, या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व एजंट आणि मध्यस्थांवर गुन्हे दाखल करून आरोपींची बँक खाती, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून जप्तीची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली. फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांना कायदेशीर संरक्षण देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी बोलताना यशवंत नडगम यांनी इशारा दिला की, जर चार दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर मुंबई येथे विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात येईल. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळालाच पाहिजे, असेही ते म्हणाले. या आंदोलनात श्रीकांत लोणारे, संतोष गायकवाड, स्नेहा माने, आकाश पायाळ, बंडू गवळी, सोमनाथ साळवे, नागनाथ निळ, रोहित कांबळे, जेम्स बालबद्र, विशाल ओव्हाळ, सनी पंजाबी, अजिंक्य म्हस्के, संजय पोटभरे, कुणाल साठे, अतुल गायतडाखे यांच्यासह राज्यातील विविध भागांतील फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार, दलित पँथरचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *