![]()
नांदेड ते वसमत मार्गावर टाकळगाव शिवारात भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी ता. २६ दुपारी घडली आहे. जखमींवर वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील विजयनगर व तरोडा भागातील पाच जण आज स्वीफ्ट कारने परभणी येथे लग्न समारंभासाठी गेले होते. त्या ठिकाणी लग्नसोहळा आटोपून सर्व जण परभणी येथून वसमत मार्गे नांदेडकडे निघाले होते. त्यांची कार वसमत ते नांदेड मार्गावर टाकळगाव शिवारात आल्यानंतर भरधाव कार अनियंत्रीत झाली. त्यामुळे चालक आशिष भास्करे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली त्यानंतर एका टीनपत्राच्या शेडला जाऊन अडकली. या अपघातात कारमधील आशिष मनोहर भास्करे (३७), सिध्दांत सोपान सांगवीकर (३०), नितेश शंकरराव खंदारे (३२), आकाश अमृता ढोकणे (२५), अनवेश अशोकराव येडके (३१) हे गंभीर झाले. या अपघाताची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार आंबादास विभुते, नामदेव बेंगाळ, विजय उपरे, तुकाराम होळपादे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र आशिष भास्करे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. तर उर्वरीत चौघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र नांदेड येथे जात असतांनाच नितेश खंदारे यांचा मृत्यू झाला. उर्वरीत तिघांवर नांदेड येथे उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर अपघात एवढा भिषण होता की त्यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत नोंद झाली नाही.
टाकळगाव शिवारात कार उलटून अपघात:2 ठार, 3 जखमी; उपचारासाठी नांदेडला हलवले
