मुंबई – राज्यातील निवृत्त वेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार दि. १ जुलै २०२५ पासून महागाई भत्ता ५५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. वित्त विभागाने मंत्रालय, मुंबई येथून काढलेल्या आदेशानुसार राज्य शासनाच्या निवृत्त वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनावर वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी मंजूर करण्यात आलेला महागाई भत्ता दि. १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत देण्यात आला होता. शासन निर्णयानुसार जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येणार असून पुढील देयके नियमित वेतनासोबत दिली जाणार आहेत. संबंधित निवृत्तीवेतन वितरण प्राधिकरण व कोषागार अधिकाऱ्यांमार्फत वाढीव रकमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हा निर्णय मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषी विद्यापीठे तसेच इतर पात्र संस्थांतील निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लागू राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. महागाईच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Post Views: 105
