पुणे फेस्टिव्हलमध्ये 'हास्य जत्रे'चा कार्यक्रम:गणेश कला क्रीडा रंगमंदिरात विनोदाची मेजवानी, रसिकांची उत्स्फूर्त दाद

[ads1]


पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘एमएचजे लाईव्ह’ हा विनोदी कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंदिरात उत्साहात पार पडला. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांना विनोदाची मेजवानी मिळाली. सभागृह पूर्ण भरले होते आणि कलाकारांनी सादर केलेल्या विनोदी प्रसंगांना प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवात पुणेकर अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने केली. तिने प्रेक्षकांशी ‘गणपतीचे दर्शन झाले का? कोणते गणपती पाहिले?’ असा संवाद साधला. गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून होते, त्यामुळे पुण्यात ‘एमएचजे लाईव्ह’ सादर करताना आनंद होत असल्याचे तिने सांगितले. समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, चेतना भट, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, पृथ्वी प्रताप, ओंकार भोजने, प्रथमेश शिवलकर, ओंकार राऊत, दत्तू मोरे, अमीर हडकर, सुनील डांगे, दशरथ सिरसट, गणेश सागडे आणि अमित फाळके या कलाकारांनी विविध विनोदी प्रसंग सादर केले. यावेळी ओंकार राऊत आणि चेतना भट यांच्या ५००व्या प्रयोगाचे निमित्त साधण्यात आले. समीर चौघुले यांनी विनोदी पद्धतीने या ५००व्या प्रयोगात अडथळा आणल्याचा प्रसंग विशेष गाजला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मामा-मामी’ या लोकप्रिय पात्रांनी भाच्याच्या लग्नातील पूजेचा प्रसंग सादर केला. त्यांच्या संवादातील विनोद आणि आवाजातील चढ-उतार यामुळे प्रेक्षकांना हसू आवरणे कठीण झाले. नम्रता संभेराव यांचे ‘लॉली’ हे पात्र आणि प्रसाद खांडेकर यांच्यातील मनःशांती केंद्रातील जुगलबंदीही प्रेक्षकांना खूप आवडली. ओंकार राऊत, पृथ्वी प्रताप आणि वनिता खरात यांनी ‘डाएटिशियन क्लिनिक’मधील पहिला रुग्ण हा प्रसंग सादर केला. यानंतर समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब आणि नम्रता संभेराव यांच्या ‘कोळी फॅमिली’च्या स्क्रिप्टलाही प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली. या वर्षी महोत्सवाच्या माध्यमातून वर्षभरासाठी नेत्रदान मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले की, सुरेश कलमाडी यांनी १९८९ मध्ये पुणे फेस्टिव्हल सुरू केला. या वर्षी महोत्सवात विविध ठिकाणी ५३ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्यातील धावपळीत विनोद मनाला आराम देतो. ‘एमएचजे लाईव्ह’ हा केवळ विनोदाचा कार्यक्रम नसून, जीवनाशी जोडलेला आनंद आणि शिकवण देणारा अनुभव आहे, असेही गोयल म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, खासदार धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक, आयकर विभागाचे अधिकारी नितीन वाघमोडे, अविनाश पाटील, नगरसेवक सुनील शिंदे आणि विश्वस्त मोहन टिल्लू उपस्थित होते.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *