IIT मुंबईच्या गेटवर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन:साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी कार्यकर्ते आक्रमक,पोलि सांकडून काही महिला कार्यकर्त्यांची धरपकड

[ads1]


IIT बॉम्बेच्या पवई कॅम्पसमधील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्या प्रकरणावरून आंदोलनाची मालिका सुरूच आहे. साहिलला न्याय मिळावा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी IIT मुंबईच्या मुख्य गेटबाहेर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पवई पोलिसांनी काही महिला कार्यकर्त्यांची धरपकड केली. साहिल वाकोडे हा IIT बॉम्बेच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागात द्वितीय वर्षात B.Techचे शिक्षण घेत होता. 18 सप्टेंबर रोजी मिड-सेमिस्टर परीक्षा दिल्यानंतर त्याचा हॉस्टेलच्या खोलीत मृतदेह आढळला. या घटनेनंतर IIT कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून, आता विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडूनही या प्रकरणात न्यायाची मागणी होत आहे. परीक्षेदरम्यान नेमके काय घडले? 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत साहिलची मिड-सेमिस्टर परीक्षा होती. IIT बॉम्बेच्या म्हणण्यानुसार, परीक्षेदरम्यान साहिलकडे मोबाइल आढळला. त्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो AI प्लॅटफॉर्मवर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे संस्थेने म्हटले आहे. यानंतर परीक्षा निरीक्षकांनी ही बाब नोंदवली. IIT प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, साहिलविरोधात तत्काळ कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती. त्याला प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी समजावून सांगितले होते आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही विद्यार्थ्यांनी वेगळी माहिती दिली आहे. मोबाइल सापडल्यानंतर साहिलला परीक्षा कक्षातून बाहेर काढण्यात आले आणि त्याला परीक्षा पूर्ण करू दिली नाही, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. तसेच एका वर्षाच्या निलंबनाची भीती दाखवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. या दाव्यांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. साहिलच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी IIT प्रशासनातील काही व्यक्तींवर मानसिक छळ आणि जातीय भेदभावाचे गंभीर आरोप केले आहेत. साहिलचे वडील रविंद्र वाकोडे यांनी प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला आणि IIT बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, साहिलने काही काळापासून आपल्यावर मानसिक त्रास आणि जातीय स्वरूपाचे वक्तव्य केले जात असल्याचे सांगितले होते. या आरोपांच्या आधारे प्राध्यापक दुल्ला यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, IIT बॉम्बेने जातीय भेदभावाचा आरोप नाकारला आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, साहिलने SC/ST सेल किंवा प्रशासनाकडे अशा प्रकारची कोणतीही तक्रार केली नव्हती. त्यामुळे या आरोपांची सत्यता तपासणे आता पोलिसांच्या तपासाचा महत्त्वाचा भाग आहे. तपास आता क्राइम ब्रँचकडे या प्रकरणाचा तपास पवई पोलिसांकडून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. क्राइम ब्रँचकडून परीक्षा कक्षातील CCTV फुटेज, त्या वेळी उपस्थित असलेले विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे जबाब तसेच इतर पुरावे तपासले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत घाईने पोहोचू नये आणि अफवा किंवा अप्रमाणित माहिती पसरवू नये, असे आवाहन केले आहे. IIT प्रशासनाची कारवाई या प्रकरणानंतर प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना त्यांच्या डीन पदाच्या प्रशासकीय जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. मात्र, ते प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याचे IIT बॉम्बेच्या फॅकल्टी फोरमने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, काही शिक्षकांनी दुल्ला यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी निष्कर्ष काढू नयेत, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर 18 मागण्यांचा प्रस्ताव साहिलच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेतील विद्यार्थ्यांनीही आंदोलन केले. विद्यार्थी कल्याण, मानसिक आरोग्याची मदत, संस्थेतील तक्रार निवारण व्यवस्था आणि प्रशासनातील पारदर्शकता यांसह विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या 18 मागण्यांच्या चार्टरवर IIT बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उद्देश परीक्षेतील गैरप्रकाराचे समर्थन करणे नसून संस्थेतील व्यवस्था, जबाबदारी आणि विद्यार्थी कल्याणाबाबत सुधारणा करण्याची मागणी करणे असल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी IIT मुंबईच्या पवई गेटवर आंदोलन केले. साहिल वाकोडेच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करावी, कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणताना महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पवई पोलिसांनी काही महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. साहिलच्या मृत्यूमागील नेमकी कारणे काय होती, परीक्षा कक्षात काय घडले आणि कुटुंबीयांनी केलेल्या जातीय छळाच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा तपास आता क्राइम ब्रँचकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील अंतिम सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. हेही वाचा… एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; मुंबई-एमएमआरमध्ये 30 लाख घरांचा मेगा प्लॅन!:ठाण्यात 6 हजार कुटुंबांना हक्काची घरे; 23 नागरी सुविधांसह ‘नव्या ठाण्या’ची उभारणी मुंबई आणि एमएमआर परिसरातील वाढत्या घरांच्या गरजा लक्षात घेता, पुढील 15 ते 20 वर्षांत तब्बल 30 लाख घरे बांधण्याचे नियोजन असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या शहरांमध्ये क्लस्टर विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सविस्तर वाचा…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *