[ads1]
![]()
“सण-उत्सव उत्साहात जरूर साजरे करा, पण त्याची किंमत निष्पाप नागरिकांना मोजावी लागू नये. लहान मुले, रुग्ण आणि वृद्धांचे आरोग्य वेठीस धरून सणांच्या नावाखाली कर्णकर्कश आवाज जनतेवर लादता येणार नाही,” अशा परखड शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारचे कान उपटले. न्यायालयाने सण, उत्सव आणि मिरवणुकांमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे, कानठळ्या बसवणारे डीजे, लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशा पथकांमधील घातक ‘टोल’ वाद्ये थेट जप्त करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने सरकारी यंत्रणांच्या कागदी दाव्यांची हवा काढली. नागपूर पोलिसांनी गणेशोत्सवात डीजेवर बंदी घातली आणि सोलापूरमध्ये डॉल्बीसह धोकादायक लेझर लाइट्सवर निर्बंध आणले; मग हाच नियम संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट का लागू होत नाही, असा जाब न्यायालयाने विचारला. या प्रकरणी प्रत्यक्ष कायद्याची चौकट आणि ठोस कृती आराखडा सादर करण्याचे आदेश राज्याचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांना दिले आहेत. लाखो वारकऱ्यांकडे फक्त टाळ, मग रस्त्यावर १० जणांच्या फटाक्यांसाठी लाखोंना वेठीस का धरता? सुनावणीदरम्यान न्यायालयाने पंढरपूर वारीचे दाखले देत उत्सव आयोजकांना आरसा दाखवला. “वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात, मात्र त्यांच्या हाती केवळ टाळ असतो आणि शिस्तबद्ध पद्धतीने भजन सुरू असते; त्यांच्यामुळे कधी कोणाला त्रास झाल्याचे ऐकिवात नाही,” अशी टिप्पणी खंडपीठाने केली. उलटपक्षी, रस्त्यावर फटाके फोडणारे अवघे १० ते १५ जण असतात, मात्र त्यांच्या धुरामुळे आणि आवाजामुळे रस्त्यांवर प्रचंड कोंडी होऊन आजूबाजूच्या लाखो रहिवाशांना नरकयातना भोगाव्या लागतात. सरकारच्या नियमांनुसार शाळा आणि रुग्णालयांप्रमाणेच धार्मिक स्थळेही शांतता क्षेत्रात (सायलेंट झोन) येतात; मग तात्पुरते उभारलेले गणपती मंडप शांतता क्षेत्रात का येऊ शकत नाहीत, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. न्यायालयाचे आदेश आणि नागरिकांना थेट दिलासा उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे सर्वसामान्य नागरिकांना ध्वनी आणि वायू प्रदूषणाविरोधात थेट कायदेशीर संरक्षण मिळाले आहे.
रस्त्यांवर फटाके उडवण्यास मनाई : सण, उत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास पूर्ण मनाई. असे करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होईल.
साधनांची जागेवरच जप्ती : मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे डीजे, साउंड सिस्टीम, लाऊडस्पीकर व ढोल पथकांमधील कानठळ्या बसवणारी ‘टोल’ वाद्ये पोलिसांकडून थेट जप्त केली जातील.
परवानगीपत्र दर्शनी भागात हवेच : प्रत्येक उत्सव मंडळाने मंडप आणि ध्वनिक्षेपकाची अधिकृत पोलिस/पालिका परवानगी नागरिकांना स्पष्ट दिसेल अशा फलकावर लावणे बंधनकारक आहे. फलक नसल्यास उभारणी अनधिकृत मानली जाईल. युपीत डीजेच्या आवाजाने दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू बलरामपूर | उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये शाळेत अचानक बेशुद्ध पडल्याने दुसऱ्या इयत्तेतील वैष्णवी मिश्रा या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शाळेजवळून जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या मोठ्या आवाजामुळे प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
[ads2]
कानठळ्या बसवणारे डीजे, स्पीकर जप्त करा- हायकोर्ट:सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी, नागपूरप्रमाणे डीजेबंदी राज्यभर का नाही- कोर्ट
















Leave a Reply