'ऐऱ्यागैऱ्याने श्रेय घेऊ नये, ठाण्याला आव्हान देऊ नये':मंत्री भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांवर पलटवार; म्हणाले- 'मराठे म्हणून आम्ही याचा समाचार घेऊ'

[ads1]


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विनंतीला मान देऊन मराठा आरक्षण व जात पडताळणीसंदर्भातील उपोषण मागे घेतले असून सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर काही आरोप केले जात असून, जवळच्या व ठराविक माणसांना जलसंपदा विभागातून कंत्राटे मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारवर दबाव टाकल्याचा दावा काहींनी केला आहे. त्यातच जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत, त्यांनी आंदोलनातील मराठ्यांना गुंतवण्याचे काम केल्याचा आरोप केला होता. ज्यावर आता मंत्री भरत गोगावले यांनी पलटवार करत त्यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भरत गोगावले म्हणाले, एकनाथ शिंदे यांची शान लाखो लाडक्या बहिणी, मराठे आणि शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कामामुळे वाढली आहे. कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचं श्रेय घेऊ नये आणि ठाण्याला कोणी आव्हान देऊ नये, अशा शब्दांत गोगावले यांनी जरांगेंवर पलटवार केला आहे. तसेच मराठे म्हणून आम्ही याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येत असून, आंतरवालीतील आंदोलनादरम्यान जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीत मराठ्यांनीच मदत केली असताना सरकारने आपली फसवणूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आपल्यावर टीका करण्यासाठी 11 टीम नेमण्यात आल्याचा आणि कॅबिनेटमध्ये एका मंत्र्याने ‘जरांगे पाटलांचे आता ऐकायचे नाही’ असे म्हटल्याचा दाखला देत, जरांगे पाटलांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. गणेशोत्सव काळात मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सत्ताधारी आणि जरांगे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. या आंदोलनात जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती, ज्याला मंत्री भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले. ‘एकनाथ शिंदे यांची शान या पठ्ठ्याने आणि गरीब मराठ्यांनी वाढवली आहे,’ या मनोज जरांगेंच्या ताज्या वक्तव्याचा समाचार घेत मंत्री भरत गोगावले यांनी आता पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *