![]()
पुणे शहरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमनसिंग सुरेंद्रसिंग गचंड (१७, रा. टिंगरे नगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दा
.
मृत मुलाची आई अनिता सुरेंद्रसिंग गचंड (४४) यांनी ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अमनसिंग हा २९ डिसेंबर रोजी सकाळी सुझुकी अॅक्सेस दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला होता. तो कामाला जातो असे सांगून गेला, मात्र रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्याचा मोबाईल फोन बंद येत होता आणि दुचाकीही सापडली नाही. २४ तासांनंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी तपास सुरू केला असता, अमनसिंगचे शेवटचे लोकेशन लोणावळा परिसरात असल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी लोणावळा आणि खोपोली पोलिसांशी संपर्क साधला. खोपोली पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांसह लोणावळा ते खंडाळा घाट परिसरात शोध घेतला, परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर नवव्या दिवशी अमनसिंगचा मृतदेह खेड शिवापूर येथे आढळून आला.
या घटनेच्या तपासात अमनसिंगच्या मोबाईलचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) आणि लोकेशन तपासण्यात आले. गुन्हे शाखा, युनिट-तीनच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, उत्तमनगर परिसरातील प्रथमेश चिदू आढळ (१९), नागेश बालाजी धबाले (१९) आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन विधीसंघर्षित बालकांनी जुन्या वादातून अमनसिंगचे अपहरण केले होते.
आरोपी बेळगाव (कर्नाटक) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून प्रथमेश आढळ आणि नागेश धबाले या दोघा आरोपींसह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी अमनसिंगचे अपहरण करून दगड आणि कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि झोन-चारच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.
