Shiv Sena AB Form Chaos Pune Election Neelam Gorhe Uday Samant PHOTOS VIDEOS | पुण्यात शिवसेनेत रात्रभर घडामोडी, एबी फॉर्मवरून गोंधळ: उदय सामंत तातडीने पुण्यात, युतीचा निर्णय ऐनवेळी बदलला, नीलम गोऱ्हे यांनी सर्वच सांगितले – Pune News



पुण्यात शिवसेना शिंदे गटामध्ये गेल्या 24 तासांत मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची रात्रभर खलबतं सुरू होती. सुरुवातीला अनेक इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले

.

मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभर पुण्यातील शिवसेनेच्या कार्यालयात मोठी वर्दळ होती. 60 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म वाटप करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. मात्र, रात्री उशिरा मुंबईहून वरिष्ठ नेत्यांकडून युतीबाबत निरोप आल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली. भाजपसोबत युती करूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याचे सांगत संबंधित एबी फॉर्म तात्काळ माघारी घेण्यात आले. या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे अनेक इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

शिवसेनेने कालपर्यंत पुण्यात स्वतंत्रपणे लढण्याची मानसिक तयारी केली होती. त्यामुळेच मोठ्या संख्येने उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या चर्चांमुळे आणि भाजपसोबत युतीच्या शक्यतेमुळे हा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला. परिणामी, ज्यांनी तयारी सुरू केली होती, प्रचाराचे नियोजन आखले होते, अशा उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज देखील भरले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अधिकृत एबी फॉर्म अद्याप सर्वांपर्यंत पोहोचलेले नाहीत.

उदय सामंत तातडीने पुण्यात, महत्वाच्या बैठकीकडे लक्ष

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत तातडीने पुण्याला रवाना झाले असून, महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यातील वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते आणि प्रमुख इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुण्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असून, पुढील काही तासांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच निवडणूक लढणार, असा दावा सूत्रांकडून केला जात आहे. मात्र, सेनेतील अंतर्गत नाराजी कशी हाताळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट संवाद

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या पुण्यातील बैठकीच्या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सर्व उमेदवारांना योग्य वेळी एबी फॉर्म दिले जातील. उदय सामंत पुण्यात येत आहेत. आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो संदेश असेल, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट संवाद सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

चर्चा सुरू आहेत, निरोप येईल तसे निर्णय

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, सध्या युतीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यासंदर्भात अजून कोणतीही ठोस प्रगती आमच्यापर्यंत आलेली नाही. काही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, मात्र सर्वांना अजून एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. वरिष्ठ नेत्यांकडून जसा निरोप येईल, त्यानुसार वेळेत एबी फॉर्म पोहोचवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. उदय सामंत, विजय शिवतारे, मी धंगेकर आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धंगेकरांच्या एनसीपी भेटीवर गोऱ्हेंची प्रतिक्रिया

दरम्यान, काल मी धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता, नीलम गोऱ्हे यांनी त्याबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याचे सांगितले. ती कदाचित सदिच्छा भेट असावी. पक्षाअंतर्गत राजकीय भूमिकेचा तो प्रश्न आहे, असे त्या म्हणाल्या. काल एबी फॉर्म देऊन रात्री परत घेतल्याच्या घटनेबाबत विचारले असता, त्यावर सध्या मी काही भाष्य करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी विषय टाळला. मात्र, पुण्यात सुरू असलेल्या या घडामोडींमुळे शिवसेनेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks