![]()
भारतीय रेल्वेच्या ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’मधील फर्स्ट एसी कोचचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वेचा डबा एखाद्या ‘हनिमून सूट’सारखा गुलाबाच्या फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेला दिसत आहे. मात्र, नवविवाहित जोडप्याचा हा रोमँटिक बेत रेल्वे प्रशासनाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने या सुरक्षा त्रुटीची गंभीर दखल घेत, ड्यूटीवर असलेल्या मुख्य तिकीट निरीक्षकाला तत्काळ निलंबित केले आहे. नेमकं प्रकरण काय? हा सर्व प्रकार ६ जुलै २०२६ रोजी धावणाऱ्या ट्रेन क्रमांक 11002 ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’मध्ये घडला. एका नवविवाहित जोडप्याने त्यांचा रेल्वे प्रवास खास बनवण्यासाठी फर्स्ट एसी कोचची सजावट करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी ‘राहत रूम डेकोरेशन’ या खासगी डेकोरेटरला ऑनलाइन बुक केले होते. हे जोडपे छत्रपती संभाजीनगरहून कारने जालना रेल्वे स्थानकावर पोहोचले. मात्र, ते ट्रेनमध्ये बसण्यापूर्वीच या डेकोरेटरने जालना स्थानकावर डब्यात अनधिकृतपणे प्रवेश केला. डेकोरेटरने संपूर्ण कोच लाल-पांढरे फुगे, हृदयाच्या आकाराचे शोभेचे साहित्य, गुलाबाच्या पाकळ्या आणि अप्पर बर्थवर “I Love You” असा संदेश लावून सजवला. व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर या ‘हनिमून कोच’ची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू झाली. रेल्वेची कडक कारवाई: टीसी निलंबित, डेकोरेटरवर गुन्हा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फर्स्ट एसीमधील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दक्षिण मध्य रेल्वेने एक्स (X) वर निवेदन जारी करत या प्रकरणावर तातडीने कारवाई केली. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, डेकोरेटरचा कोचमधील प्रवेश पूर्णपणे अनधिकृत होता आणि ही एक अत्यंत गंभीर सुरक्षा त्रुटीआहे. या हलगर्जीपणाबद्दल ड्युटीवर असलेले मुख्य तिकीट निरीक्षक गिरीश कुमार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच, त्यांची सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वेच्या सुरक्षित परिसरात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी संबंधित डेकोरेटरवर ‘रेल्वे कायद्यांतर्गत’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेचे सुरक्षा नियम काय सांगतात? भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, आरक्षित एसी डब्यांमध्ये केवळ वैध तिकीट असलेले प्रवासी आणि अधिकृत रेल्वे कर्मचारी यांनाच प्रवेशाची परवानगी असते. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला (खासगी डेकोरेटरसारख्या) अधिकृत परवानगीशिवाय कोचमध्ये प्रवेश देणे, हे सुरक्षेचे मोठे उल्लंघन मानले जाते. यामुळे प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. नेटकऱ्यांचा संताप: “लोकांमध्ये सिव्हिक सेन्स उरलेला नाही” या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही लोकांनी याला कल्पक म्हटले असले तरी, बहुतांश लोकांनी रेल्वेच्या सुरक्षेवर आणि जोडप्याच्या नागरी कर्तव्यावर बोट ठेवले आहे. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, “भारतीयांचा मूर्खपणा शिखरावर आहे. ट्रेन ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि लोकांमध्ये अजिबात सिव्हिक सेन्स उरलेला नाही. या जोडप्यावर आणि डेकोरेटरवर दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे.” फर्स्ट एसीसारख्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आणि महागड्या डब्यात कोणतीही बाहेरील व्यक्ती सामानासह कशी पोहोचली आणि तिला प्रवेश कोणी दिला? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
रेल्वेचा डबा की 'हनिमून सूट!' VIDEO:जालन्यात फर्स्ट एसी कोचमधील रोमँटिक सजावट टीसीच्या अंगलट; थेट निलंबनाची कारवाई!
