Chandrapur Kidney Trafficking Case: Farmer Alleges Cambodia Surgeries, SIT Probes Network | कंबोडियात माझ्यासह 6 भारतीयांची किडनी काढली: चंद्रपूरच्या पीडित शेतकऱ्याचा दावा, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय; SIT स्थापन – Nagpur News



सावकारी पाशात अडकून चंद्रपूरच्या एका शेतकऱ्याला कंबोडियात जाऊन किडनी विकावी लागल्याच्या प्रकरणाने आता भयानक वळण घेतले आहे. पीडित शेतकरी रोशन कुडे यांनी एक खळबळजनक दावा केला असून, “कंबोडियात माझ्यासोबत आणखी 6 भारतीय तरुणांची देखील किडनी काढण्यात आली,”

.

नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रोशन कुडे यांनी आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची आपबीती सांगितली. त्यांच्या माहितीनुसार, कंबोडियातील रुग्णालयात किडनी काढण्यासाठी नेण्यात आलेल्या लोकांमध्ये त्यांच्यासोबत राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेश येथील तरुणांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे, या गटासोबत असलेला नाशिकचा एक तरुण विमानतळावरूनच पळून जाण्यात यशस्वी झाला, अशी माहिती कुडे यांनी दिली. यामुळे या रॅकेटची व्याप्ती देशभर पसरली असल्याचा संशय बळावला आहे.

नेमके प्रकरण काय?

कोरोना काळात दुग्ध व्यवसायात आलेले अपयश आणि जनावरांना झालेली ‘लंपी’ आजाराची लागण यामुळे रोशन कुडे आर्थिक संकटात सापडले होते. सावकाराकडून घेतलेले अवघे एक लाख रुपयांचे कर्ज फेडता आले नाही. सावकारांनी वसुलीसाठी पाशवी पद्धतीचा वापर केला. 1 लाख रुपयांच्या मुद्दलावर दिवसाला 10 हजार रुपये व्याज आकारण्यात आले. बघता बघता 1 लाखाचे कर्ज तब्बल 74 लाखांवर पोहोचले. सावकारांच्या जाचाला कंटाळून रोशन यांनी आपली दोन एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील चीजवस्तू विकल्या. तरीही सावकाराचे समाधान झाले नाही.

कर्ज फिटत नसल्याचे पाहून सावकाराने रोशनला किडनी विकण्याचा अमानुष सल्ला दिला. त्यानंतर एका एजंटमार्फत त्यांना आधी कोलकाता येथे नेण्यात आले. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना थेट ‘कंबोडिया’ देशात नेण्यात आले. तिथे शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढण्यात आली आणि ती 8 लाख रुपयांना विकली गेली. जीव धोक्यात घालून मिळवलेले हे पैसेही सावकाराच्या घश्यात गेले.

तपासासाठी ‘SIT’ ची स्थापना

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्याकडे देण्यात आले आहे. या पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजीत आमले, एलसीबीचे निरीक्षक अमोल कचोरे, सायबरचे निरीक्षक सुनील गाडे आणि ब्रह्मपुरीचे निरीक्षक प्रमोद बानबले यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक आता या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय ‘कनेक्शन’ शोधून काढणार आहे.

आणखी दोन संशयितांची नावे पुढे

तपासादरम्यान किडनी काढण्याशी संबंधित ‘डॉ. कृष्णा’ याच्या नावाचा खुलासा आधीच झाला आहे. आता पोलिसांना आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांची भूमिका तपासली जात आहे. तसेच सावकार आणि पीडित शेतकरी यांच्यातील आर्थिक व्यवहारांचा तपशील मिळवण्यासाठी बँकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मारहाण झाली, त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला आहे.

पाच आरोपी अटकेत

या प्रकरणात आतापर्यंत पाच सावकारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांची पोलिस कोठडी 20 एप्रिलला संपत असून, ती वाढवून मागण्याची शक्यता आहे. एसआयटीच्या तपासात आता आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *