'दिव्य मराठी' इम्पॅक्ट:आधार व वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील नावाच्या तफावतीची परिवहन विभागाकडून गंभीर दखल

[ads1]


आधार कार्डवरील नाव आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील (स्मार्ट कार्ड) नावात तफावत असल्याने वाहन हस्तांतरण, नाहरकत प्रमाणपत्रासह विविध कामे ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात दिव्य मराठीने २ सप्टेंबर रोजी ठळकपणे वृत्त प्रकाशित करून परिवहन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या वृत्ताची दखल घेत अखेर परिवहन विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार वाहनविषयक कामांसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक करण्यात आले आहे. मात्र, आधार कार्ड आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रातील नाव किंवा पत्ता जुळत नसल्याने वाहन ४.० प्रणालीवर अनेक अर्ज दाखलच होत नव्हते. परिणामी राज्यातील बहुतांश परिवहन कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे प्रलंबित असल्याचे परिवहन विभागाने मान्य केले आहे. परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील नाव अथवा पत्ता आधार कार्डाशी जुळत नसल्यास वाहनधारकाकडून आवश्यक पुरावे घेऊन नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती करावी. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट आदी कागदपत्रांची पडताळणी करून पुढील वाहनविषयक कामकाज करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आधार आणि वाहन प्रणालीतील नाव जुळत नसल्याचा संदेश आल्यास वाहनधारकाला आधार कार्डमध्ये आवश्यक दुरुस्ती करून घेण्यास सांगावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहनविषयक अर्ज हस्तलिखित पद्धतीने स्वीकारून कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर संबंधित कामकाज पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. यामुळे महिनाभरापासून रखडलेल्या वाहनधारकांच्या कामांना आता मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *