![]()
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर निवडीकडे लागले असून, अकोला महानगरपालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने सत्तेसाठी नवीन समीकरणे उदयाला येत आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अकोल्यात सत्तेचा पेच निर्माण झाला असतानाच, भाजपने चक्क शिवसेना ठाकरे गटाला युतीची खुली ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असले, तरी अकोल्यात स्थानिक सत्तेसाठी हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या संभाव्य युतीमुळे अकोल्याच्या राजकारणात नवी वळणे येण्याची चिन्हे दिसत आहेत. अकोला महानगरपालिकेत बहुमताचा 41 हा आकडा गाठण्यासाठी भाजपने शिवसेना ठाकरे गटाला थेट सत्तेची साद घातली असून, भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीने या संभाव्य युतीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. 80 सदस्यीय महापालिकेत 38 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमतासाठी त्यांना अजून 3 जागांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत ठाकरे गटाचे 6 नगरसेवक किंगमेकरच्या भूमिकेत असून, ही युती झाल्यास हा आकडा 44 वर पोहोचून सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे. राज्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू असताना अकोल्यातील ही स्थानिक तडजोड राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपने शिवसेना ठाकरे गटाकडे मदतीचा हात मागितला असून, त्या बदल्यात ठाकरे गटाने उपमहापौरपद आणि स्थायी समिती सभापती पदाची महत्त्वाची मागणी लावून धरली आहे. या प्रस्तावावर भाजपच्या गोटात सध्या विचारविनिमय सुरू असतानाच, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एक गुप्त बैठक पार पडली असून त्यात शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले की, शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर जो पक्ष सकारात्मक भूमिका घेईल, त्याच्यासोबत आम्ही हातमिळवणी करण्यास तयार आहोत. सध्या तरी आमचे सत्तेचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत.
राज्यात विरोधक, अकोल्यात मैत्री?:सत्तेसाठी भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची साद; बहुमतासाठी अडले
