![]()
नागपूर ग्रामीण येथील आनंद को.ऑपरेटिव्ह सोसायटीची सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव असलेली जागा नियमबाह्य पद्धतीने विकून केलेल्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली. यामुळे सहकार मंत्री यांनी या प्रकरणी आलेला चौकशी अहवाल चुकीचा असल्याची कबुली देत सहाय्यक निबंधक यांच्या निलंबनाची घोषणा केली. या घोटाळ्याप्रकरणी मुख्य अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांची एक महिन्यात चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन सभागृहात दिले. नागपूर येथील आनंद सोसायटी येथील खसरा क्रमांक १०अ आणि १० ब या जागेवर टाकलेल्या सार्वजनिक उपक्रमासाठी टाकलेल्या ११ हजार १०७ चौरस फुटाची आरक्षित जागा संस्थेचे सचिव कैलास चुटे यांनी आर्थिक लाभापोटी बेकायदेशीर पद्धतीने विकले. या प्रकरणी विधानसभेत प्रशोंत्तर काळात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले. सार्वजनिक उपक्रम म्हणून ट्रान्सफॉर्मसाठी आरक्षित असलेली जागा चुटे यांनी आर्थिक व्यवहार करून प्लॉटधारक साळुंखे यांना दिलेली असल्याची गोष्ट सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. बेसा ग्रामपंचायत मध्ये असताना सोसायटीचे सचिव चुटे यांनी दोन ले आऊट सार्वजनिक उपक्रमासाठी असल्याचे दाखवले होते. मात्र बेसा नगरपंचायत झाल्यानंतर नकाशात लेआऊट मधील जागा बेकायदेशीर पद्धतीने विकल्याचे स्पष्ट झाले. उपनिबंधकांनी चुकीचा अहवाल दिला त्यांचे निलंबन त्याचबरोबर याची चुकीची नोंद मुख्य अधिकारी बेसा यांनी घेतल्यामुळे ते ही यात दोषी आहेत ,ज्या उपनिबंधकांनी चुकीचा अहवाल दिला त्यांचेही निलंबन करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. यावर उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी अहवाल चुकीचा असल्याचे मान्य करत सहाय्यक निबंधक यांच्या निलंबनाची घोषणा केली.तसेच इतर अधिकाऱ्यांच्या चौकशीचे निर्देश दिले.
विजय वडेट्टीवारांनी आक्रमक भूमिका मांडताच सरकारकडून चुकीची कबुली:नागपूरमधील घोटाळा प्रकरणी सहाय्यक निबंधक निलंबित
