रोहित पवारांना पक्षाचा कब्जा हवाय:मंत्री अनिल पाटलांची आरोप; हे नाटक करायची गरज नसल्याचे म्हणत सुनील शेळकेंचीही टीका




दिवंगत नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर, हा अपघात आहे की घातपात अशी शंका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच व्हीएसआर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी ठिय्या केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. हे नाटक करायची गरज नाही, असे म्हणत आमदार सुनील शेळके यांनी टीका केली आहे. तर, रोहित पवारांना पक्षाचा कब्जा हवा आहे, त्यासाठी ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत, असा पलटवार मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत आमदार अनिल पाटील म्हणाले, अजित दादांवर जर तुमचे खरेच प्रेम असेल तर नाटक करायची काही गरज नाही. रोहित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. रोहित पवार काही एजन्सी नाहीत, त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत, असे पाटील म्हणाले. तसेच, जर त्यांना सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एवढेच वाटत आहे तर जेव्हा त्या राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत, तेव्हा त्यांना सोडून जायला नको होते. पुढे बोलताना अनिल पाटील म्हणाले, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार पत्रकारांना थोड्या दिवसात बोलतील. अमोल मिटकरी असेल किंवा आम्ही सगळे आमदार असू, आमचे एकच म्हणणे आहे की सगळ्या घटनेचा तपास झाला पाहिजे, सत्य बाहेर आले पाहिजे आणि यंत्रणा ते काम करतील, असेही अनिल पाटील यांनी म्हटले. रोहित पवारांना पक्षाचा कब्जा हवाय रोहित पवारांना पक्षाचा कब्जा हवा आहे, त्यासाठी ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत, असा आरोपही अनिल पाटील यांनी केला आहे. राज ठाकरे असतील किंवा रोहित पवार असतील ते काहीही बोलू द्यात, यंत्रणा योग्य तपास करतील, असेही पाटील म्हणाले. दादांच्या बाबतीत कोणीही राजकारण करत नाही- सुनील शेळके तर दुसरीकडे आमदार सुनील शेळके यांनी देखील रोहित पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले, रोहित पवार हे दररोज नव-नवीन पुरावे समोर आणत आहेत, मग ते वरिष्ठ नेते पवार साहेब, सुनेत्राताई पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसून त्यांच्यासमोर का मांडत नाहीत? दादांच्या बाबतीत कोणीही राजकारण करत नाही. मुळात आमच्या पक्षात काय चालले आहे याकडे पाहण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चालले आहे हे पहावे, असे शेळके यांनी म्हटले. पुढे बोलताना सुनील शेळके म्हणाले, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी सुनेत्राताईंची निवड करून योग्य तो मानसन्मान आम्ही ठेवलेला आहे. झिरवाळांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले आहे. रोहित पवार जे आरोप करत आहेत, त्यात तथ्य नाही, असेही शेळके यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *