किन्नर गुरूंची जिगळा येथे भव्य दिव्य आखाड पाणी पूजा व मिरवणुकीचे आयोजन


बिलोली (प्रतिनिधी) –  नांदेड जिल्ह्यातील जिगळा क्र. १, ता. बिलोली येथे मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी किन्नर समाजाच्या धार्मिक परंपरेनुसार भव्य दिव्य आखाड पाणी पूजा, दिव्य अभिषेक, भव्य मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक सोहळ्यासाठी देशभरातील संत-महंत, किन्नर गुरू, महामंडलेश्वर तसेच हजारो भाविक भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या भव्य धार्मिक सोहळ्यास श्री श्री १००८ श्री महंत उमाशंकर भारतीजी महाराज (काशी), माहूर पीठाधीश्वर श्री श्री १००८ श्री महंत डॉ. धनेश्वर भारतीजी महाराज, श्री श्री १००८ श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज (क्षेत्र माहूर), आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर श्री श्री १००८ डॉ. लक्ष्मीनारायण त्रिपाठी, नांदेडच्या श्री आदि गादीपती किन्नर गुरू श्री रंजीता नायक तसेच महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सर्व मान्यवरांच्या सान्निध्यात हा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता मुख्य दिव्य अभिषेकाने होणार असून, त्यानंतर संत-महंतांच्या आशीर्वादाने भव्य दिव्य मिरवणुकीस प्रारंभ होईल. या मिरवणुकीमध्ये विविध धार्मिक परंपरांच्या आकर्षक झांकी, भजनी मंडळे, वारकरी संप्रदाय, किन्नर समुदायातील देवकर, महामंडलेश्वर, महंत, विविध आखाड्यांचे प्रतिनिधी तसेच धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक संपूर्ण परिसरातून मार्गक्रमण करणार आहे.

दरवर्षीप्रमाणे हा आखाड पाणी महोत्सव जिगळा येथे आयोजित करण्यात येत असून, किन्नर विकास परिषद, देवगिरी प्रांतच्या संयोजिका व जिगळा येथील गुरुमाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फरीदा वकश यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून धार्मिक परंपरा, अध्यात्म आणि सामाजिक समरसतेचा संदेश देणारा हा महोत्सव परिसरातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव म्हणून ओळखला जातो.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, किन्नर समुदाय हा मंगलमुखी समाज म्हणून ओळखला जातो. सर्व धर्मांचा सन्मान, सर्वधर्म समभाव, राष्ट्रहित, विश्वशांती, सामाजिक ऐक्य, सर्व समाजाचे कल्याण आणि प्रत्येक कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी विशेष पूजा, अभिषेक व प्रार्थना करण्यात येणार आहे. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी, समाजात सौहार्द निर्माण व्हावे, प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी या उद्देशाने या धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

किन्नर समुदायाबाबत समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करून त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, तसेच किन्नर समाजाविषयी सकारात्मक सामाजिक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशानेही या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. किन्नर समुदाय केवळ आशीर्वाद देणारा समाज नसून सामाजिक समरसता, सेवा, अध्यात्म आणि मानवकल्याणाची परंपरा जपणारा समुदाय असल्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.

 

 या दिवशी उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून, सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी, भाविक भक्तांनी व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत-महंतांचे व किन्नर गुरूंचे शुभ आशीर्वाद घ्यावेत, महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन किन्नर विकास परिषद, देवगिरी प्रांतच्या संयोजिका फरीदा वकश यांनी केले आहे. तसेच अमर गोधने, राजू कांबळे व समस्त जिगळा ग्रामस्थांनी सर्व भाविक भक्तांनी या भव्य धार्मिक महाउत्सवाचा लाभ घ्यावा, आखाड पाणी पूजा, भव्य मिरवणूक व महाप्रसादामध्ये सहभागी होऊन संत-महंतांचे व किन्नर गुरूंचे मंगलमय आशीर्वाद प्राप्त करावेत, असे नम्र आवाहन केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *