हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का:अतिष दांडेगावकरांचा गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश, विकासाच्या मुद्द्याचा दिला दाखला




हिंगोली जिल्ह्यात राजकिय उलथापालथ सुरुच असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी अतिष दांडेगावकर गुरुवारी ता. २६ भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. विकासाच्या मुद्यावर तसेच सर्वांना सोबत घेण्याच्या भूमिकेतून आपण भाजपात प्रवेश करीत असल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र असलेल्या अतिष दांडेगावकर यांनी मागील काही दिवसांपासून पक्षाची कमान सांभाळली होती. अतिष दांडेगावकर राजकिय क्षेत्रात सक्रिय झाल्यामुळे वसमत विधानसभा मतदार संघासह जिल्हयाच्या राजकारणावर त्याचा परिणाम दिसू लागला होता. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारीही त्यांनी चालवली होती. मात्र राष्ट्रवादी ऐवजी भाजपामध्ये प्रवेश करून जिल्हयाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जाऊ लागला होता. त्यामुळे अतिष दांडेगावकर यांनीही कार्यकर्त्यांच्या अग्रहास्तव भाजपात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्यापार्श्वभुमीवर त्यांनी वसमत विधानसभा मतदार संघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांची भुमीका जाणून घेतली होती. त्यानुसार त्यांनी भाजपात प्रवेश करावा असा एकमुखी निर्णय कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यानुसार अतिष दांडेगावकर यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वसमतसह जिल्हाभरातून सुमारे चार हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. गुरुवारी ता. २६ मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात ते भाजपात प्रवेश घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे हिंगोली जिल्हयात भाजपाला आणखी बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात अतिष दांडेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांचा आग्रह व विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन आपण भाजपात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *