पुणे रेल्वे स्टेशन येथे चार वर्षीय मुलीवर अत्याचार:राज्य महिला आयोगाने घेतला प्रकरणाचा आढावा, मुलगी आणि कुटुंब मध्यप्रदेशमधील




राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे रेल्वे स्थानकावरील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा आढावा घेतला. १७ तारखेला घडलेल्या या घटनेत चार वर्षीय मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, पीडित मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली. बुधवारी पत्रकार परिषद घेत चाकणकर यांनी ‘सुरक्षित पुणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,’ असे म्हटले. यावर्षी रेल्वे स्थानक परिसरात १३ मुले-मुली सापडली असून, त्यांना बालगृहात ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक घेण्यात आली. बाहेरून येणाऱ्या टवाळखोरांना प्रवेश रोखण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी मनुष्यबळ वाढीसाठी प्रस्ताव पाठवला असून, सध्या उपलब्ध मनुष्यबळ पुरेसे असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजकीय घडामोडींवर बोलताना चाकणकर यांनी अजित पवार यांच्याशिवाय राज्याचे राजकारण पुढे जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. घटनेच्या पहिल्या दिवसापासून सखोल चौकशी व्हावी, ही पक्षाची भूमिका असल्याचे सांगत, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे त्या म्हणाल्या. उद्या सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारतील व त्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, पार्थ पवार यांना राज्यसभेची संधी मिळावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून, याबाबत पुन्हा आढावा घेणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. भिगवण प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याचे नमूद करत, कायदा आपले काम करेल आणि दोन समाजांत तेढ निर्माण होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. आमदारांविरोधात तक्रारी आल्यास चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *