![]()
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता राष्ट्रीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अपघाताच्या तपासात राज्य सरकार आणि सीआयडीकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप करत, आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण ‘इंडिया’ आघाडीने लावून धरावे, अशी मागणी केली आहे. विशेषतः विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक समिती स्थापन करून त्याचे अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे सोपवावे, अशी मागणी त्यांनी केली. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी सीआयडीने सात ते आठ तास चौकशी केली. मात्र, या चौकशी दरम्यान त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. यानंतर रोहित पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, आजही सीआयडीने AAIB चा अंतिम अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन रोहित पवारांना दिले. सीआयडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवार साधला. यावेळी त्यांनी बोलताना उपरोक्त मागणी केली. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी इंडीया आघाडीने अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा. या अपघाताबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांची समिती स्थापन करण्यात यावी आणि त्याच अध्यक्षपद राहुल गांधींकडे देण्यात यावे. राहुल गांधींच्या जवळच्या लोकांसोबत याबाबत बोलणे झाले असल्याचे रोहित पवार म्हणाले. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अपघाताच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. मोठ्या लेवलवर चौकशी व्हावी यासाठी मोठ्या लेवलवर प्रयत्न करावे लागतील, असेही रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट सीआयडी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. ते आपल्या पोस्ट म्हणाले, AAIB चा रिपोर्ट आल्यानंतर VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मागील भेटीच्यावेळी CID च्या अधिकाऱ्यांनी दिले होते, पण हा अहवाल येऊन आठ दिवस झाले तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच काल चौकशीसाठी आलेल्या व्ही. के. सिंग याला पोलिसांकडूनच VIP ट्रिटमेंट देण्यात आली. CID ऑफिसमध्ये एके-४७ सह त्याच्या सुरक्षा गार्डला परवानगी देण्यात आली. म्हणूनच आज पुन्हा CID च्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. परंतु आजही गुन्हा दाखल करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. रोहित पवार म्हणाले, फायनल रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे नवीन आश्वासन सीआयडी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. याचा अर्थ व्ही. के. सिंग कुणाचंतरी नाव घेईल म्हणून त्याला वाचवण्यासाठी व्ही. के. सिंगला जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे का? असा आमचा प्रश्न आहे. पण कितीही वेळकाढूपणा केला किंवा कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही सुरुच ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला. रोहित पवारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट दरम्यान, रोहित पवार यांनी आज अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेऊन या अपघाताशी संबंधित जमा केलेल्या संपूर्ण तपशीलाची आणि चौकशीकामी सुरु असलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांना दिली. तसेच या अपघातात अजित पवारांसह मृत्यू झालेले जाधव, माळी आणि पाठक कुटुंबियांच्या मागणीसंदर्भातही सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली. एकनाथ शिंदेंना दिली तपशीलवार कागदपत्रे याशिवाय रोहित पवार यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची मुंबईत भेट घेऊन या अपघाताबाबत गोळा केलेली संपूर्ण तपशीलवार कागदपत्रे आणि अपघाताच्या चौकशीकामी सुरु असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. तसेच अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडावा, अशी विनंतीही रोहित पवार यांनी एकनाथ शिंदेंकडे केली. या अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करुन अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार अपघात प्रकरण:इंडिया आघाडीने हा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमा – रोहित पवार
