![]()
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत विरली बु. परिसरात अवैध दारू तस्करी करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी विना क्रमांकाची दुचाकी आणि मोठ्या प्रमाणात देशी दारू असा एकूण ९४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी लाखांदूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी विरली परिसरात शासकीय कामासाठी गेले असताना, त्यांना एका इसमाबाबत गुप्त माहिती मिळाली. ‘एक व्यक्ती लाल-काळ्या रंगाच्या दुचाकीवरून अवैध दारूची वाहतूक करत आहे’ अशी माहिती मिळताच पोलिसांनी दोन पंचांसह विरली बु. येथील आंबेडकर चौक परिसरात सापळा रचला, दुपारी २:४० वाजताच्या सुमारास संशयित इसम विना क्रमांकाच्या हिरो एच.एफ. डिलक्स दुचाकीने येताना दिसला. पोलिसांनी त्याला अडवून विचारपूस केली असता, त्याने आपले नाव नरेश शंकर गभणे (वय ४५ वर्ष, रा. धामणी, जि. भंडारा) असल्याचे सांगितले. पोलिसांनी दुचाकीच्या टाकीवर ठेवलेल्या कापडी पिशवीची झडती घेतली असता, त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या, ‘टायगर ब्रँड’ देशी दारूच्या ९० मिलीच्या १०० सीलबंद बाटल्या (किंमत ४,००० रु.), विना क्रमांकाची हिरो एच.एफ. डिलक्स गाडी (किंमत ९०,००० रु.) असा एकूण ९४,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे दारू वाहतुकीबाबत कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने, पोलिसांनी दारूचे नमुने रासायनिक परीक्षणासाठी जप्त केले आहेत. आरोपी नरेश गभणे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलीस शिपाई ओंकार सपाटे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
लाखांदूर पोलिसांची मोठी कारवाई:विना क्रमांकाच्या दुचाकीवरून होणारी गावठी दारूची तस्करी उघड
