![]()
जुन्या अमरावती शहरातील भाजीबाजार परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती समितीने ६ मार्च रोजी तिथीनुसार होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाची तयारी सुरू केली आहे. या महोत्सवासाठी नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, ज्येष्ठ विधीज्ञ आणि स्वीकृत नगरसेवक ॲड. प्रशांत देशपांडे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गणेशदास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. ॲड. देशपांडे यांच्यासोबत नगरसेवक आशिष अतकरे यांनाही स्वागताध्यक्षपदाचा मान देण्यात आला आहे. याशिवाय, भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्यावर समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महोत्सवांतर्गत, शुक्रवार, ६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पुरातन सोमेश्वर मंदिरात समितीच्या वतीने भगवान महादेवाला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. हा जन्मोत्सव सोहळ्याचा एक भाग असेल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मनपा शाळा क्रमांक ६ च्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचे पालखीपूजन केले जाईल. येथून विविध देखावे, ढोल पथक, आतिषबाजी आणि टाळ-मृदुंगांच्या दिंड्यांसह भव्य महाशोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करून पुन्हा त्याच ठिकाणी विसर्जित होईल. या बैठकीत विहिंपचे बंटी पारवानी व प्रा. किशोर बुरंगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सचिव अशोक पांडे यांनी नूतन कार्यकारिणी घोषित केली. बैठकीच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक सुधीर बोपुलकर यांनी केले. यावेळी विहिंपचे अध्यक्ष अनिल साहू, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाश पाठक, माजी नगरसेविका गंगाताई खारकर, नगरसेविका लविनाताई हर्षे, कोषाध्यक्ष अभिनव हिरुळकर, सहकोषाध्यक्ष आशिर्वाद गौड, निलेश शर्मा, संयोजक प्रथमेश दलाल, सह संयोजक ओम आष्टीकर, व्यवस्थापक सुयोग खारकर, प्रसिद्धी प्रमुख ॲड. प्रथमेश गणेशकर, सह प्रसिद्धी प्रमुख आकाश गौड, तसेच सदस्य रवि पारवे, सुनील सावरकर, सुमित तिवारी, पंकज गायकवाड, अंकुश गुल्हाने, श्रवण मेहरे, उमेश कुशवाहा, अनिकेत जावरे, वैभव बेलसरे आदी उपस्थित होते.
अॅड. प्रशांत देशपांडे छत्रपती शिवाजी महाराज जयंती समितीचे स्वागताध्यक्ष:6 मार्चला भाजीबाजारातून निघणार महाशोभायात्रा; तयारी सुरू
