अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त शेतकरी संकटात:विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारला घेरले; सत्ताधाऱ्यांचीही मिळाली साथ




काँग्रेस विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याच्या मुद्यावरून सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. त्यांनी या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी करत धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप बोनस मिळाला नसल्याकडेही सरकारचे लक्ष वेधले. त्यांच्या मदतीला भाजप आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारही धावून आले. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी, गहू, हरभरा ही काढणीला आलेली पिके मातीमोल झाली आहेत. आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचेही अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सोलापूर, परभणी, नांदेड, धाराशीव भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही, धानाला बोनस जाहीर करून देण्यात आलेला नाही आणि आता पुन्हा संकट आले आहे. सरकारने नियम-निकष बाजूला ठेवून तातडीने रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. शक्तीपीठ महामार्गावरूनही धरले धारेवर एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त होत असताना दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या घराघरांवर नोटिसा चिकटवून दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे सहजपूर-जवळा सारख्या ६०० लोकसंख्येच्या गावात १,००० पोलिसांचा फौजफाटा तैनात करून मोजणी प्रक्रिया राबवली जात आहे. हे लोकशाहीला भूषणावह नाही. धाराशीव, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी २३ फेब्रुवारीला या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला होता. हा प्रकल्प रद्द करावा, अशी जनभावना असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एकीकडे अस्मानी संकटामुळे शेतकरी खचला आहे, तर दुसरीकडे सुलतानी संकटाप्रमाणे सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या जमिनी हिसकावत आहे. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेटीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्ष यांनी याची दखल घेऊन सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले. काँग्रेस आमदाराला बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीचाही केला उल्लेख विजय वडेट्टीवार यांनी यावेळी अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगने दिलेल्या धमकीचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता आमदार साजिद खान पठाण यांना एक आंतरराष्ट्रीय कॉल आला. बिश्नोई गँगशी सबंधित शुभम लोणकर याने फोन करून आमदारांकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्याने अत्यंत उद्दामपणे म्हटले की, पोलिसांना सांगितले तर ते महिना-दोन महिने संरक्षण देतील, पण सहा महिन्यांनी किंवा वर्षाने आम्ही तुला सोडणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेचे काय? ज्या गँगने यापूर्वी गोळीबाराच्या घटना घडवून आणल्या आहेत, त्यांच्याकडून धमकी येणे ही अतिशय गंभीर बाब आहे. धमकीचा ऑडिओ ऐकला तर अंगावर काटा येतो. साजिद पठाण यांचा कोणत्याही गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध नाही, तरीही त्यांना लक्ष्य केले जात आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निर्देश दिले की, हा विषय अत्यंत गंभीर आहे. शासनाने तात्काळ या प्रकरणाकडे लक्ष देऊन संबंधित आमदारांच्या सुरक्षेबाबत योग्य ती पावले उचलावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *