नांदेड परिक्षेत्रात २४ कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त; खबर हेल्पलाइनवर माहिती देण्याचे आवाहन
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-४ अंतर्गत १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या पंधरवड्यात एकूण ७४८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ९९८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण २४ कोटी ३६ लाख ६ हजार ८८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत गुटखा विक्री, मटका-जुगार, अवैध दारू विक्री, शस्त्र अधिनियम तसेच इतर अवैध व्यवसायांविरुद्ध ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत गुटखा विक्रीप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अंतर्गत ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून, २६ लाख ९१ हजार ३१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये १२१ गुन्हे दाखल करून ४१ लाख ९३ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सर्वाधिक ४५४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १६ लाख ८४ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शस्त्र अधिनियमान्वये १८ गुन्हे दाखल करून ७८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर इतर कायद्यांनुसार १४४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईत २३ कोटी ४९ लाख ५८ हजार ७१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे अवैध वाळूविरुद्ध कारवाई केली. तसेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे गुटखाविरोधी कारवाई करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील गांधी चौक, निलंगा आणि अहमदपूर येथे मटका व जुगाराविरुद्धही कारवाई करण्यात आली.
अवैध व्यवसायांची माहिती खबर हेल्पलाइनवर द्या
नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ९१५०१००१०० या मोबाईल क्रमांकावर ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी या हेल्पलाइनवर आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Post Views: 140
