कृष्ण शृंगार – फ्लॉवर्स ऑफ द कदंबा:छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पार पडली काव्य, संगीत आणि ओडिसी नृत्याची मंत्रमुग्ध करणारी संध्या

0
new-project-28_1771681578.gif




छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी ‘कृष्ण शृंगार, फ्लॉवर्स ऑफ द कदंबा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काव्य, संगीत आणि नृत्य यांच्या सुरेल संगमाने साकारलेल्या या संध्याकाळी कला रसिक, अभ्यासक आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रख्यात लेखक व कला इतिहास अभ्यासक हर्षा व्ही. दहेजिया यांच्या फ्लॉवर्स ऑफ द कदंबा या काव्यसंग्रहावर आधारित या कार्यक्रमात कृष्ण शृंगाराची भावमय अनुभूती साकारण्यात आली. हा केवळ प्रेमकथांचा आलेख नसून प्रेमातून आत्मज्ञानाकडे नेणारा काव्यमय प्रवास असल्याचे या सादरीकरणातून अधोरेखित झाले. ओडिसी नृत्यांगना प्राची जरीवाला यांचे मोहक नृत्याविष्कार हे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं. त्यांच्या भावपूर्ण अभिनयाने आणि नृत्यभंगिमांनी शृंगार रसाची सुंदर अभिव्यक्ती साकारली. प्रतिक शाह आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक अशीत देसाई यांच्या सुरेल संगीतरचनांनी कार्यक्रमाला भावस्पर्शी रंग दिला. पूर्वी आनंद, मनोज देसाई आणि गर्गी वोरा यांच्या मधुर गाण्यांनी वातावरण अधिकच भारावून गेले. ‘भागवत पुराणातील “माझी उपासना विधी-विधाने नव्हे, तर गीत आणि नृत्याने करा” या संदेशाला अनुसरून साकारलेला हा कार्यक्रम प्रेम, भक्ती आणि आत्मचिंतनाचा सुरेल उत्सव ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या सादरीकरणाचा आनंद घेतला. कला आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवणारी ही संध्या अनेकांच्या स्मरणात राहील अशा रसिकांच्या भावना होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed