बारावीच्या गणिताच्या पेपरला आज सर्व केंद्रांवर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची उपस्थिती– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


जिल्हाधिकाऱ्यांनी बरबडा व सोमठाना परीक्षा केंद्राना दिल्या भेटी

नांदेड- इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा आज जिल्ह्यातील 111 केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. आज झालेल्या गणित विषयाच्या पेपरसाठी एकूण 19,056 परीक्षार्थ्यांपैकी 18,743 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीचे प्रमाण 98.36 टक्के इतके नोंदविण्यात आले.

 

प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेर्‍यांच्या माध्यमातून पूर्णवेळ नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व 111 केंद्रांवर परीक्षा कॉपीमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

 

यापूर्वी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परीक्षा कालावधीत केंद्रावर परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती आढळल्यास भारतीय न्यायसंहितेच्या कलम 163 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा दिला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून आज कोणत्याही केंद्रावर अनधिकृत व्यक्ती आढळून आली नाही.

 

किनवटचे सहायक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोंतुला यांनी पळशी तांडा येथील परीक्षा केंद्रास भेट दिली असता तीन परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. संबंधितांविरुद्ध मंडळाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच या केंद्रावर कंपाऊंड वॉल नसणे व शौचालय दूर असणे या कारणांमुळे केंद्राची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 

नायब तहसीलदार, कंधार यांनी लाल बहादूर शास्त्री उमावि, संगुचीवाडी ता. कंधार येथील केंद्रास भेट दिली असता दोन परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळले. त्यांच्याविरुद्धही मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली.

 

आजच्या गणिताच्या पेपरसाठी जिल्हास्तरावरील सुमारे 58 अधिकारी 58 परीक्षा केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित होते. स्वतः जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमठाणा व बरबडा येथील केंद्रांना भेट दिली असून बरबडा येथे ते पेपर संपेपर्यंत उपस्थित होते.

 

शिक्षण विभागाचे ७ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी असे एकूण 40 अधिकारी विविध केंद्रांवर कार्यरत होते. एकूण 105 केंद्रांवर भरारी पथकांनी पूर्णवेळ उपस्थिती नोंदवली.

 

जिल्ह्यात इयत्ता 10 वी व 12 वीच्या सर्व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरू असून विद्यार्थ्यां व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित परीक्षा देखील अशाच शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.


Post Views: 67






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *