मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस, मेघा नदीला पूर:शिरसगाव कसबा आणि ब्राम्हणवाडा येथील पूर्णा नदीही दुथडी भरून वाहतेय




महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील बैतुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा गावाजवळून वाहणारी मेघा नदी आणि ब्राम्हणवाडा थडी गावातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शिरसगाव कसबा परिसरात काहीशी चिंतेची स्थिती होती. नदीकाठावर आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चांदूरबाजारचे तहसीलदार योगेश गाडे यांनी नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मध्य प्रदेशातील मुसळधार पावसामुळे चांदूरबाजार तालुक्यातील विस्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पाची तीन दारे २० सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत. सकाळी १० वाजल्यापासून नदीपात्रात ४८.०१ घनमीटर प्रतिसेकंद एवढा विसर्ग केला जात आहे. पावसाचा जोर वाढल्यास हा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती पूर्णा मध्यम प्रकल्पाचे उपअभियंता सागर अलाटकर यांनी दिली. दरम्यान, मेघा नदीला मोठा पूर आल्याने ती पूर्ण क्षमतेने वाहत आहे. या नदीपात्रातील गावाला लागून असलेले दोन्ही विदर्भ कोल्हापुरी बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. गावातील धाकडीपुऱ्यानजीकच्या लहान पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने गावाला जोडणाऱ्या या पुलावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *