दिव्यांगांच्या 55 मागण्यांसाठी राज्यव्यापी अभियान सुरू:प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र, 9 महिने फिरणार कार्यकर्ते




दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. अमरावती येथून सुरू झालेले हे अभियान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये नऊ महिने चालणार आहे. अभियानाचे प्रमुख आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अम्मोल वालके यांनी सांगितले की, दिव्यांगांचे हक्क, सन्मान, रोजगार, शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक न्यायाशी संबंधित ५५ मागण्या या अभियानाचा भाग आहेत. महाराष्ट्रातील लाखो दिव्यांग नागरिक आजही शिक्षण, रोजगार, आरोग्य, स्वावलंबन, सामाजिक सुरक्षा आणि शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित आहेत, असे वालके यांनी नमूद केले. या प्रमुख मागण्यांमध्ये दिव्यांगांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन, ती दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जमा होणे, सर्व जिल्ह्यांमध्ये ई-रिक्षा व स्कूटीचे वितरण, दिव्यांग जनसंवाद हा शासकीय कार्यक्रम म्हणून घोषित करणे, १५ लाखांपर्यंत आरोग्य विमा, पदवीधर दिव्यांगांना रोजगार किंवा १५ हजार रुपये मानधन, ६ टक्के आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, सर्व शासकीय कार्यालये पूर्णतः सुगम करणे, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग सहायता केंद्र स्थापन करणे, दिव्यांग महिला व मुलांसाठी विशेष योजना तसेच २०१६ च्या कायद्याची कठोर अंमलबजावणी यांचा समावेश आहे. अभियानादरम्यान, मुख्यमंत्री यांच्या नावे ५५ मागण्यांचे निवेदन प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांना सादर करण्यात येणार आहे. तसेच, सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग नागरिकांशी संवाद साधला जाईल. दिव्यांग समाजाच्या या मागण्यांवर सकारात्मक व तातडीने निर्णय घेऊन त्यांना सन्मानपूर्वक व स्वावलंबी जीवन जगण्याची संधी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी मेघा वालके, रेणुका बोबडे, ललिता गोतमारे, अपर्णा खोडे, पूर्वी चौरसिया, मोहम्मद मुजम्मिल अब्दुल वशीर, गोकुळ सुरपाटणे, अक्षय लागणे, दिनेश अळसपुरे, अमोल पावडे, सागर ठाकरे आदी उपस्थित होते. दरम्यान, दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल वाळके हे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी बुधवार, २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान जिल्हाभरातून सुमारे ५०० प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *