नांदेडचा विकास खड्ड्यात की रस्ताच पाताळात? २४ तासांच्या पावसाने महापालिकेची ‘इज्जत’ धुवून नेली!


घडला तो प्रकार असा: बंधा घाटाकडे जाणारी एक बिचारी कार (क्रमांक MH 26 BC 0395) आज सकाळी आपल्या संथ गतीने चालली होती. पण बिचाऱ्या चालकाला काय माहिती, की ज्या रस्त्यावरून तो जातोय, तिथे रस्ता नसून प्रशासनाने एक गुप्त खंदक तयार करून ठेवला आहे! कार कॉलेजच्या गेटसमोर पोहोचताच रस्ता अचानक जमिनीच्या पोटात गेला आणि कारचा पुढचा भाग थेट खड्ड्यात घुसला. हा खड्डा आधीपासून तयार नव्हता, तर गाडीचा दाब पडताच निकृष्ट कामाचा फुगा फुटला आणि रस्ताच खाली बसला.

कर वसुलीत वाघ, सुविधेत मात्र शून्य! नागरिकांकडून वेळेवर कर वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासन किती तत्पर असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. कर भरला नाही तर मालमत्ता जप्त करण्याची धमकी देणारे हे प्रशासन भौतिक सुविधा देताना मात्र कुठल्या बिळात लपून बसते? जनतेचा घामाचा पैसा आणि रक्ताचा कर घेऊन प्रशासनाने नागरिकांना काय दिले? तर रस्त्यांच्या नावाने खड्डे आणि मरणाचे सापळे!

गुत्तेदारांचे लाड आणि निकृष्ट कामाचा ‘वायब्रेटर’! शहरात सगळीकडे रस्त्यांची कामे सुरू असल्याचा आव आणला जातोय, पण तिथे वापरली जाणारी यंत्रणा म्हणजे केवळ एक फार्स आहे. रस्त्यांचे काम करणारी वायब्रेटर मशीन केवळ शोभेची वस्तू बनली असून ती कामच करत नाही, असा संताप व्यक्त होत आहे. कोणत्याही त्रयस्थ सिव्हिल इंजिनिअरला बोलावून तपासणी केली, तर या कामात हजारो त्रुटी निघतील, पण गुत्तेदारांचे भले करण्याच्या नादात प्रशासनाला या त्रुटी दिसत नाहीत.

नशिबाने वाचले प्राण! आजच्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे केवळ त्या चालकाचे नशीब म्हणावे लागेल. पण उद्या जर तिथे एखादा दुचाकीस्वार असता किंवा एखादी मोठी दुर्घटना घडली असती, तर त्याचे पाप कोणाच्या पदरात पडले असते? प्रशासनाने सुरक्षेची कोणतीही यंत्रणा न राबवता नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे.

एकूणच काय, तर पावसाने महापालिकेच्या स्मार्ट कामाची पोलखोल केली असून, आता तरी प्रशासनाला जाग येईल की पुन्हा एखाद्या अपघाताची वाट पाहिली जाईल, हाच मोठा प्रश्न आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *