सेवा क्षेत्र सर्वेक्षण, पुण्यात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न:देशाच्या जीडीपी-धोरणनिर्मितीसाठी सेवा क्षेत्राची अचूक माहिती आवश्यक- डॉ. रुही कुलकर्णी




भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) वार्षिक समाविष्ट सेवा क्षेत्र उद्योग सर्वेक्षण-2026 संदर्भात पुण्यात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. सेंटर फॉर पोलिस रिसर्च ऑडिटोरियम येथे झालेल्या या कार्यशाळेत सेवा क्षेत्रातील उद्योगांना सर्वेक्षणाची माहिती, ऑनलाइन माहिती सादर करण्याची प्रक्रिया आणि त्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी एनएसओ, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त संचालक व प्रादेशिक प्रमुख डॉ. रुही कुलकर्णी होत्या. तर, राज्य कर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त रेश्मा घाणेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी एनएसओचे अधिकारी आणि विविध सेवा क्षेत्रातील उद्योगांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. रुही कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, एएसआयएसएसइ हे देशातील समाविष्ट सेवा क्षेत्र उद्योगांचे पहिले सर्वसमावेशक वार्षिक सर्वेक्षण आहे. त्याच्या यशासाठी उद्योगांकडून अचूक, संपूर्ण आणि वेळेत माहिती मिळणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रातील नमुन्यांची संख्या देशात सर्वाधिक असल्याने या सर्वेक्षणाला विशेष महत्त्व आहे. या माहितीच्या आधारे देशाचा जीडीपी, राष्ट्रीय उत्पन्न लेखे तसेच पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीसाठी विश्वासार्ह सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रेश्मा घाणेकर यांनी सेवा क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील वाढते योगदान अधोरेखित केले. जीएसटीआयएन आधारित या सर्वेक्षणातून उलाढाल, रोजगार आणि आर्थिक घडामोडींचे वास्तव चित्र समोर येईल, असे त्यांनी सांगितले. सर्व उद्योगांनी प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देऊन या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेतील तांत्रिक सत्रात एएसआयएसएसइ चे उद्दिष्ट, व्याप्ती, नमुना निवड पद्धती आणि ऑनलाइन पोर्टलद्वारे प्रश्नावली भरण्याची प्रक्रिया याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *