![]()
वैजापूर पंचायत समिती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रभारी गटविकास अधिकारी, प्रशासकीय कारभारावरील प्रश्न, बैठकींतील गोंधळ आणि कामांमध्ये टक्केवारीच्या चर्चांमुळे आधीच टीकेचे धनी ठरलेल्या पंचायत समितीवर आता भ्रष्टाचाराचा आणखी एक डाग लागला आहे. सोमवारी (२९ जून) पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थीला दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी जिओ-टॅगिंग व फोटो अपलोड करण्याच्या कामाच्या मोबदल्यात अवघ्या १ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रवीण गायकवाड (रा. पानवी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार केली होती. पडताळणीत लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून लाचेची रक्कम, इतर रोख रक्कम आणि दोन मोबाइल जप्त केले. पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी कारवाईचे नेतृत्व केले, तर पोलिस निरीक्षक प्रतिभा अबूज तपास अधिकारी आहेत.
लाच स्वीकारताना वैजापूर येथे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता एसीबीच्या जाळ्यात:पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी घेतली 1 हजाराची लाच
