![]()
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वादग्रस्त विधान करत महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फोडले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान सपकाळ यांनी केले आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी!:हर्षवर्धन सपकाळांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी माफी मागावी- CM देवेंद्र फडणवीस मालेगावात महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद निर्माण झालेला असतानाच, त्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाने आणखी वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सपकाळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्याप्रकारचे आहे, त्यांनी जो स्वराज्या विचार दिला, त्याच मांदियाळीत, त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्याविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपूत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ते बुलढाण्यात बोलत होते. संपूर्ण सरकारच लाचखोर दरम्यान, यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकारणावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात 50 हजारांची लाच घेतली, हे प्रकरण फार छोटे आहे. हे संपूर्ण सरकारच लाचखोर आहे. नरहरी झिरवाळ यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे पण कोट्यवधी रुपये खाणारे देवेंद्र फडणवीसांवर काय कारवाई करणार हे आधी सांगा. या असंवैधानिक सरकारचा आम्ही निषेध करतो. पटेल यांचा ‘तो मी नव्हेच’ म्हणण्याचा जुना स्वभाव’ पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अजितदादा आता राहिले नाही. शरद पवार आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत, त्यांचा पक्ष त्यांच्या विचाराने चालेल का? तटकरे आणि पटेल हा पक्ष चालवणार आहेत हा कळीचा मुद्दा आहे. पटेल यांचा ‘तो मी नव्हेच’ म्हणण्याचा जुना स्वभाव’ आहे, ते पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आले आहे. अजितदादा हे चांगले प्रशासक होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील लोकांनी लूट करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या गळ्यात फास लावल्यावरच शांत बसतील भूम परंड्यात सहा महिन्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी आले. यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, हे वरातीमागून घोडे आहे आणि आता शेतकऱ्यांना ते वाटाण्याच्या अक्षता लावून निघून जातील. तसेच मुनगंटीवार यांचा बंगला घेण्याइतपट माझी ऐपत नाही. मात्र रेडी रेकनरच्या दरात ते जर बोलत असतील तर मी त्यांना कळवेल, असेही सपकाळ म्हणाले. तसेच अमेरिकेशी केलेल्या करारामुळे शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही. नरेंद्र सरेंडर हे शेतकऱ्यांच्या गळ्यात फास लावल्यावरच शांत बसतील, अशी टीका सपकाळ यांनी केली.
टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे:ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे; हर्षवर्धन सपकाळांचे वादग्रस्त विधान
