नवी मुंबईत धक्कादायक प्रकार!:मनपा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवतीचा बळी, नागरिकांकडून संताप




राज्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत असली, तरी विशेषतः शासकीय रुग्णालयांची स्थिती आजही अत्यंत विदारक आहे. अस्वच्छता, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, कर्मचाऱ्यांची वानवा आणि कोलमडलेली यंत्रणा यामुळे रुग्णांना नाहक मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या ढिसाळ कारभाराचे भीषण उदाहरण काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळाले होते. तिथे रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगत एका गरोदर मातेला चक्क रुग्णवाहिका नाकारण्यात आली होती; ज्याचा परिणाम म्हणून वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्या मातेच्या पोटातच बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हिंगोलीतील या धक्कादायक घटनेची चर्चा सुरू असतानाच, आता नवी मुंबईतूनही अशीच एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऐरोली येथील एका शासकीय रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. एवढेच नव्हे, तर याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या आणखी एका गर्भवती महिलेची प्रकृती देखील अत्यंत चिंताजनक आहे. या लागोपाठ घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेतील भोंगळ कारभार आणि रुग्णांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, कथित चुकीच्या इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सोनम डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रिचा मिश्रा या दुसऱ्या गर्भवती महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या दोघींचीही प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने ऐरोलीवरून वाशी येथील मनपा संदर्भ रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले होते. रुग्णालयाच्या या भोंगळ कारभारामुळेच ही दुर्दैवी वेळ ओढवल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांकडून केला जात असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी नवी मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवल्याचे दावे प्रशासनाकडून सातत्याने केले जात असले, तरी अशा धक्कादायक घटनांमुळे या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ‘या निष्काळजीपणाला जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या कोणालाही पाठीशी न घालता, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता नवी मुंबईकरांकडून केली जात आहे. एकही काच शाबूत ठेवणार नाही- मनसे “नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी केलेली कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणात पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे; अन्यथा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची एकही काच शाबूत ठेवली जाणार नाही,” असा आक्रमक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *